नाशिक : पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टॅँकर मंजुरीचे अधिकार शासनाला असल्यामुळे ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल त्यासाठी मुदतवाढीचे नवीन प्रस्ताव तहसीलदारांना सादर करावे लागणार आहेत.नाशिक जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा मुद्दा पुढे करून मार्च महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली होती. त्यातही काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दबाव टाकल्यामुळे टॅँकर सुरू होऊ शकले होते. एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्णात उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे टंचाईत वाढ होऊन गावोगावी टॅँकरची मागणी वाढली होती. साधारणत: जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन नद्या, नाल्यांना पाणी येते तसेच विहिरींचे स्रोत प्रवाहित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटत असल्याची शासनाची भावना आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले असून, जून महिन्याचा पाऊस लांबणीवर पडला आहे. मात्र सरकारचे नियम, निकष बदलायला तयार नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टॅँकर बंद झाल्याने पुन्हा एकदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव सिन्नर तहसील कार्यालयाने पाठविला आहे.२६९ गावांचा समावेशच्जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ११९ गावे, २२२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु शेवटच्या आठवड्यात मान्सूनने चांगली हजेरी लावल्यामुळे २२ टॅँकरची संख्या कमी झाली होती. असे असले तरी, शासनाने टंचाई कृती आराखड्यानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांना टॅँकर सुरू करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे रविवारी जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा या सहा तालुक्यातील २६९ गावांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर बंद करून टाकले आहेत.
कमी पाऊस पडूनही जिल्ह्यातील टॅँकर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 1:28 AM