साकोरा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यासाठी सतरा सदस्यांना उपस्थितीसाठी अगोदर नोटीस देण्यात आली होती. त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. धात्रक व ग्रामविकास अधिकारी बी. बी. सरोदे तसेच तलाठी कपिल मुत्तेपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अवघे नऊ सदस्य उपस्थित झाले. सरपंच पदासाठी साकोरा विकास आघाडीकडून निवडून आलेल्या मात्र गेल्या चाळीस दिवसांपासून बाळनाथ महाराज पॅनलबरोबर फिरणाऱ्या वनिता बोरसे व ताराबाई सोनवणे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले. त्यानंतर आपलं पॅनलच्या वंदना बाळू दुरडे यांनी अर्ज दाखल केला, तर उपसरपंचपदासाठी बाळनाथ महाराज पॅनलचे किरण बोरसे व विकास आघाडीचे घनश्याम सुरसे यांनी अर्ज दाखल केला. एक वाजेपर्यंत माघार घेण्याचे घोषित केले. ऐन सरपंच निवडीच्या बारा तास अगोदरच जिल्हा परिषद निवणुकीच्या वेळी समोरासमोर उभे असलेले राष्ट्रवादीचे अमित बोरसे यांनी आपल्याच पॅनलमधून निवडून आलेल्या वनिता बोरसे यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्याशी हातमिळवणी केली व अज्ञात स्थळी बैठक घेऊन सरपंचपदाची सूत्रे हलवून आज ऐनवेळी बाळनाथ महाराज पॅनलमधून निवडून आलेल्या ताराबाई सोनवणे यांना सरपंचपदाचे आमिष दाखवून आपल्या गटात सामावून घेतल्याने आपलं पॅनल व साकोरा विकास आघाडी मिळून शिवसेना व राष्ट्रवादी मिळून सरपंच ताराबाई सोनवणे व उपसरपंच घनश्याम सुरसे यांच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. याप्रसंगी मोनाली सूर्यवंशी, अतुल बोरसे, वंदना दुरडे, सोनाली आहिरे, नरहरी भोसले, यशोदा डोळे, दीपाली मोरे आदी सदस्य उपस्थित होते.
साकोरा सरपंचपदी ताराबाई सोनवणे ; उपसरपंचपदी घनश्याम सुरसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 5:43 PM