दिंडोरी : शासकीय आश्रमशाळा म्हटलं की तेथे नाना समस्या पाचवीला पुजलेल्या. जेथे मूलभूत सुविधांची मारामार तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव तर दुर्मिळच. मात्र, कोणतेही शासकीय अनुदान अथवा लोकवर्गणी न काढता बोपेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षिका श्रीमती हेमवती श्रीराम कु-हाडे यांनी मात्र स्वखर्चातून आपला सहावीचा वर्ग डिजिटल बनण्यात पुढाकार घेतला आहे. स्पर्धात्मक युगात आपल्याही विद्यार्थ्यांना सर्वच भौतिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने कु-हाडे यांचा हा उपक्रम चर्चित ठरला आहे.पदवीधर प्राथमिक शिक्षिका असलेल्या श्रीमती हेमवती श्रीराम कु-हाडे या बोपेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत नुकत्याच बदलून आल्या आहेत. यापूर्वी चांदवड तालुक्यातील पारेगाव आश्रम शाळेत देखील त्यांनी स्वखर्चाने आपला वर्ग डिजिटल बनविला होता. बोपेगाव येथे बदलून येताच त्यांनी इयत्ता सहावीच्या वर्गाची जबाबदारी स्वीकारली . शासकीय आश्रम शाळा असल्याने येथे शाळेला डिजिटल वर्ग करण्यासाठी अनुदान तर नाहीच शिवाय पालकांकडून लोकवर्गणी कशी मिळवायची हा प्रश्न होता. मात्र जिल्हा परिषदेसह खासगी प्रशासनाच्या शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि अद्ययावत तंत्रज्ञान प्रशिक्षण आपल्या मुलांनाही मिळावे या हेतूने त्यांनी येथे बदलून येताच संपूर्ण वर्गच स्वखर्चाने डिजिटल बनविला आहे. ई लर्निंग सॉफ्टवेअरसह एलईडीच्या साहाय्याने अध्ययन-अध्यापन डिजिटल करताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी त्यांनी वर्गामध्ये इंटरनेट व वायफाय सुविधा उपलब्ध करून वर्ग स्मार्ट केला आहे. वर्गात विद्यार्थ्यांच्या सुरक्षततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, प्रथोमपचार पेटी देखील बसविली आहे. शिवाय वर्गाच्या भिंतीही बोलक्या झाल्या आहेत.
शिक्षिकेने स्वखर्चातून वर्ग केला डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 4:10 PM
बोपेगाव आश्रमशाळा : संगणकासह इंटरनेट, वायफायची सुविधा
ठळक मुद्देयापूर्वी चांदवड तालुक्यातील पारेगाव आश्रम शाळेत देखील त्यांनी स्वखर्चाने आपला वर्ग डिजिटल बनविला होता