लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोविड- १९ च्या उपचारांमध्ये अनेक रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचारपद्धती उपकारक ठरते आहे. यामुळे प्लाझ्मालाही मागणी वाढली आहे. ही बाब लक्षात घेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेत कोरोना होऊन गेलेल्या संस्थेच्या पदाधिकारी, शाळा पदाधिकारी, शिक्षक व पालकांनी शासकीय नियमानुसार प्लाझ्मा दान करावे व कोरोना रुग्णांचे प्राण वाचवावे, असे आवाहन करणारे पत्रक संस्थेने शाळांना पाठविले आहे.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेने १ मे रोजी १०३ वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करतानाच प्लाझ्मा दान मोहिमेत सहभाग घेतला आहे. संस्थेने नाशिक,नाशिकरोड,सिन्नर, ईगतपुरी, नांदगाव संकुलातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ आरंभ महाविद्यालय, सिनिअर कॉलेज व आय.टी.आय. या शाळांना पत्रके पाठविल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी दिली. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्यामुळे प्लाझ्मा दान केल्याने गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत उपयोगी असते. करोना आजारातून संपूर्णतः बऱ्या झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा काढून तो कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरपी असून अशा प्लाझ्मा रुग्णांसाठी संजीवक ठरत असल्याने पात्र प्लाइमा दात्यांनी जनकल्याण संस्थेतील पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान,संस्थेचे सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल व सचिव अश्विनीकुमार येवला यांनी केले आहे.
इन्फो -
प्लाझ्मा हा रक्तातील एक गुणकारी द्रव घटक असून त्यांचे रक्तातील प्रमाण सुमारे ५५ % इतके असते. यामध्ये माणसाच्या जीवनावश्यक घटकद्रव्ये, पेशी आणि विशेषतः प्रथिने असतात. प्लाझ्मा दानाने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. रक्तदात्याने दान केलेला प्लाझ्मा शरीर काही तासांत पुन्हा बनवत असते. र्थायराईड , मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले व्यक्तीसुध्दा रक्तपेढीतील प्लाझ्मा दान करू शकतात. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्यांचे वय १८ ते ६० च्या दरम्यान आहे. ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे. जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली असून डिस्चार्ज किंवा होम क्वॉरंटाईनच्या सुमारे २८ दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकतात.