‘त्यांचा’ अंतीम प्रवास सुकर करण्यासाठी झटतोय सेवाव्रतींचा चमू !
By अझहर शेख | Published: June 25, 2020 05:19 PM2020-06-25T17:19:53+5:302020-06-25T17:51:21+5:30
कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज
अझहर शेख, नाशिक : शहर व परिसरात कोरोना आजाराने मृत्यू पावलेले व कोरोना संशयित म्हणून मृत्यू झालेल्या एकूण ७० मृतदेहांचा दफनविधी शहरातील विविध कब्रस्तानांमध्ये करण्यात आला आहे. यासाठी शहरातील काही बोटावर मोजण्याइतके सामाजिक कार्यक र्ते अहोरात्र परिश्रम घेत ‘त्यांचा’ अखेरचा प्रवास सुकर करण्यासाठी झटताना दिसत आहेत.
मुस्लीमबहुल भागातील एकूण ४८ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे तर २२ कोरोना संशयित रूग्ण अद्याप दगावले आहेत. या सर्व मृतदेहांचा अखेरचा प्रवास सुकर करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा चमू झटत आहेत. आपल्या आरोग्याची कुठलीही तमा न बाळगता केवळ माणुसकीखातर समाजातील हे सेवाव्रती प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, याऊलट या सेवकांनाही वेळेप्रसंगी टीकेचे धनी व्हावे लागत असल्याची शोकांतिका आहे.
...असा आहे सेवाव्रतींचा चमू
सय्यद तुराब अली शाह बहुउद्देशीय संस्थेचे रिजवान नसीर खान यांनी मुस्लीम समाजाच्या दफनविधीसाठी लागणारे साहित्य पुरविण्याचा ठेका महापालिकेकडून घेतला आहे. रिजवान खान हे सुरूवातीपासूनच बेवारस मृतदेहांचे ‘वारस’ म्हणून शहर व परिसरात परिचित आहेत. कोरोना आजाराच्या या संकटकाळात रिजवान यांच्यासह सुरूवातीपासूनच मुस्लीम समाजाच्या मृत्यू नोंदीचे काम करणारे रफीक साबीर हेदेखील कोरोनाच्या रूग्णांचा मृतदेह दफनविधीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना मोलाची साथ मिळतेय जहांगीर कब्रस्तानात कबर खोदणारा युवक फिरोज शेख तसेच वडाळागावातील गौसिया कब्रस्तानांत कबर खोदणारे युवक रहिम व आसिफ यांची. ज्या कब्रस्तानात जेसीबी यंत्र सहजरित्या जाऊ शकते तेथे ना नफा ना तोटा या तत्वावर राजूभाईंकडून जेसीबी उपलब्ध करून दिले जात आहे. हे जेसीबी चालविण्यासाठी चालक म्हणून अशपाक शेख, गणेश आणि अमर हेदेखील तितकेच कष्ट उपसत आहेत. वडाळागावातील गौसिया कब्रस्तानात सध्यस्थितीत प्रत्येकी ७ फूट खोली असलेल्या २५ कबर जेसीबीद्वारे खोदण्यात आल्या आहेत. या सेवाव्रतींच्या सामाजिक व पुण्यकर्माला कुठेही अडथळा होऊ नये आणि दफनविधीचा खोळंबा होऊ नये, म्हणून हाजी रऊफ पटेल यांच्याकडूनही महत्त्वाची साथ लाभत आहेत. हायड्रोक्लोराईडसह सर्व सेवाव्रतींना मृतदेह दफनविधीदरम्यान लागणारा पीपीई सूट पटेल यांच्याकडून सातत्याने पुरविला जात आहे.