पुणे विद्यापीठ परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:28+5:302021-06-20T04:11:28+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या द्वितीय सत्रासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या द्वितीय सत्रासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाला भेट देत असल्याने सर्व्हर ठप्प होत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी उद्भवत असून, ‘सर्व्हर अनॲव्हेलेबल’ अशी सूचना संकेतस्थळावर दाखविली जात असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत रविवारी (दि.20 ) संपुष्टात येणार असल्याने अर्ज भरण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांची एकाच वेळी लगबग सुरू झाल्याने अशा प्रकारे तांत्रिक अडचणींचा सामना कराला लागत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. पुणे विद्यापीठाने जुलै, ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले असून, या परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरायचा आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर लिंक पाठविण्यात आली असून, अर्जात तांत्रिक चुका टाळण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांकडून सायबर कॅफेतून अर्ज भरण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून संकेतस्थळात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना अर्जच भरता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. संकेतस्थळ दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत तासन्तास विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये बसावे लागत असून, गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचीही भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे, दरम्यान, विद्यार्थ्यांना सायबर कॅफेवर चकरा माराव्या लागत आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.