टेहरे ग्रामस्थांनी रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:32+5:302021-03-07T04:13:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील टेहरे गावाजवळ वारंवार अपघात होत आहेत, यामुळे संतप्त झालेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील टेहरे गावाजवळ वारंवार अपघात होत आहेत, यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावाजवळ गतिरोधक, पथदीप, भुयारी मार्ग, सर्व्हिस रोड करावा, या मागणीसाठी शनिवारी काही काळ रास्तारोको आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. यावेळी ग्रामस्थांनी टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, विनापरवानगी रास्तारोको केल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. महामार्गावरील टेहरे गावाजवळ गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने नेली जातात. गेल्या आठवड्यात याठिकाणी चार ते पाच अपघात झाले. शनिवारी दुपारी एका कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लगतच्या रिक्षा स्टॉपजवळील लिंबाच्या झाडावर आदळली. यावेळी नजीकच असलेल्या टपरीमधील ग्रामस्थ सुदैवाने बचावले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर येत काही काळ रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले व कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येत टोल कंपनीचे अधिकाऱ्यांसमवेत आंदोलकांची समजूत काढली.
---------------
आश्वासनानंतर आंदोलन मागे
टेहरे गावाजवळ महामार्गावर गतिरोधक बसवावा, पथदीप बसवावेत, भुयारी मार्ग, सर्व्हिस रोडची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी सोमवारी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शेवाळे, प्रवीण शेवाळे, नाना शेवाळे, अनिल पाटील, विजय शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, नंदलाल शेवाळे, देवेंद्र हिरे, महेंद्र अहिरे, मुन्ना शेवाळे, मुकुंद शेवाळे, रोशन शेवाळे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
---------
मालेगाव तालुक्यातील टेहरे गावाजवळ ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. (०६ टेहरे)
===Photopath===
060321\06nsk_13_06032021_13.jpg
===Caption===
०६ टेहरे