सप्तशृंगगडावर दूरध्वनी सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2015 11:12 PM2015-08-04T23:12:44+5:302015-08-04T23:13:36+5:30
सप्तशृंगगडावर दूरध्वनी सेवेचा बोजवारा
सप्तशृंगगड : देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक गडावर येताच आप्तेष्टांपासून ‘नॉट रिचेबल’ होतात. ही किमया घडवून आणली आहे, भारत दूरसंचारच्या विस्कळीत झालेल्या सेवेने. भारत दूरसंचार निगमने लाखो रुपये खर्चून गडावर दूरध्वनी केंद्र तसेच मनोऱ्याची उभारणी केली आहे; परंतु येथे येणाऱ्या भाविकांना, ग्रामस्थांना चांगल्याप्रकारे सेवा मिळत नसल्याने हा मनोरा शोभेची वस्तू ठरत आहे.
सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांकडून पर्यटक तसेच ग्रामस्थांकडून दूरसंचारची भ्रमणध्वनी आणि फोन सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील गावातील फोन सुविधा सहा ते सात महिन्यांपासून बंद झालेली आहे. त्यामुळे आॅनलाइन बँकिंग व्यवहार, सप्तशृंगगड ट्रस्टचा कारभार, फॅक्स करणे, मोबाइलची चांगली रेंज या सुविधा येथे मिळत नसल्याने निम्म्याहून अधिक ग्राहकांनी आपले दूरध्वनी संच व मोबाइलचे बीएसएनएलचे सीमकार्ड बंद करून दुसऱ्या कंपनीचे सीमकार्ड घेणे पसंद केले आहे. याबाबत नाशिक येथील मुख्य दूरध्वनी कार्यालयातील जनरल मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कळवण दूरध्वनी केंद्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो, असे उत्तर गेल्या काही महिन्यांपासून ऐकायला मिळत आहे, तर कळवण येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, केबल शिल्लक नसल्यामुळे काम थांबले आहे, अशी उत्तरे देऊन आपल्या अंगावरचे धोंगडे झटकताना दिसत आहे; परंतु याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)