नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला फाटा येथे नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भरधाव मुंबईकडे जाणारा टेम्पो दुभाजकावर आदळून अपघात झाला. यात चालक बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली.नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मुंबईकडे टेम्पो (एमएच ४६ एएफ २६८७) जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो दुभाजक तोडून विरुध्द दिशेला जाऊन महामार्गावर उलटला. टेम्पोचालक गाडीतच अडकला होता. अपघाताचा आवाज ऐकून जवळच असलेल्या नागरिकांनी धाव घेऊन चालकास बाहेर काढले.परिसर हा गोंदे औद्योगिक वसाहतींमध्ये असल्यामुळे यावेळी येथे कामगारांची वर्दळ असते. तसेच महामार्गाच्या बाजूला व्यावसायिकांची दुकाने तसेच जवळच पेट्रोलपंप होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. इतर कोणतेही नुकसान झाले नाही. काही वेळातच क्रेनच्या सहाय्याने टेम्पो उभा करून चालक मुंबईकडे रवाना झाला.