दहा हजार मतदारांची होणार अडचण
By admin | Published: February 16, 2017 11:30 PM2017-02-16T23:30:04+5:302017-02-16T23:30:17+5:30
प्रभाग १३ : दूरवरील मतदान केंद्रांमुळे गैरसोय
नाशिक : मतदारांच्या सोयीच्या ठिकाणी आणि जवळ मतदान केंद्रे असावीत, अशी निवडणूक आयोगाची भूमिका असताना नाशिक शहराच्या प्रभाग १३ मध्ये मात्र, केवळ शिवसेना उमेदवाराच्या सोयीसाठी मतदान केंद्रे दूरवर म्हणजे दोन किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आली असून, त्यामुळे दहा हजार मतदारांना मतदान करणे अडचणीचे होणार आहे, त्यामुळे ही मतदान केंद्रे स्थानांतरित करावी, अशी मागणी कॉँग्रेस उमेदवारांनी केली आहे.
प्रभाग १३ मध्ये असलेले कॉँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे, वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे गजनान शेलार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरेखा भोसले यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. बालाजी कोट, नाव दरवाजा, दत्त कोट, आसराची वेस, मधली होळी, चित्रघंटा, कापड बाजार तसेच गाडगे महाराज धर्मशाळा या परिसरातील १० हजार ७९६ मतदारांसाठी इतर ठिकाणी अतिशय लांबच्या जागेवर मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नेहरू चौक, कापड बाजार, कानडे मारुती लेन, तिवंधा चौक, सराफ बाजार येथील मतदारांना बालाजी कोट शॉपिंग सेंटर जवळ असताना प्रत्यक्षात मात्र सारडा कन्या विद्यालय हेच केंद्र देण्यात आले आहे.
बालाजी कोट, मुरलीधर लेन येथील मतदारांना शासकीय अध्यापिका महाविद्यालय केंद्र देण्यात आले आहे. त्यांनाही बालाजीकोट हे केंद्र जवळचे होते. दत्तकोट, गाडगे महाराज पूल, नाव दरवाजा, गाडगे महाराज धर्मशाळा, आसराची वेस, मोदकेश्वर मंदिर परिसरातील मतदारांना महापालिकेच्या मालकीचे गाडगे महाराज शॉपिंग सेंटर जवळचे असताना प्रत्यक्षात मात्र धान्य बाजारातील मनपा शाळा क्रमांक १२ मध्ये मतदान केंद्र जोडण्यात आले आहे.
गाडगे महाराज धर्मशाळेच्या परिसरातील मतदारांना वावरे लेनमधील मराठा समाज मंगल कार्यालयात जोडण्यात आले आहे. म्हणजेच या मतदारांच्या परिसरात मतदान केंद्रांची व्यवस्था न करता एक ते दोन किलोमीटर अंतरावरील मतदान केंद्रांवर जोडण्यात आले आहेत. महिला आणि वृद्ध मतदारांना मतदान करता येऊ नये यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.