नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता नवीन वर्षात म्हणजेच ३१ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाणार आहे.
सीबीएसईतर्फे यापूर्वी ५ जुलै २०२० रोजी देशभरातील ११२ शहरांमध्ये परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. त्यासाठीचे प्राथमिक नियोजनही करण्यात आले होते; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. आता सीबीएसई बोर्डाने टीईटी परीक्षेच्या तारखांसंदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार केंद्रीय स्तरावर घेतली जाणारी ही टीईटी परीक्षा रविवार, ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. यावेळी १३५ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले असून, परीक्षा केंद्रांची संपूर्ण यादी सीटीईटीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सीबीएसईने उमेदवारांना परीक्षा केंद्रात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करायचा असेल त्यांना १६ डिसेंबरपर्यंत परीक्षा केंद्रात बदल करता येणार आहे.