नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे आईनेच सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस प्रशासनाने तपास करून सदर आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील ढेकू येथील जनाबाई अप्पा पेंढारे यांनी आपल्या मुलाच्या मानसिक आजाराला कंटाळून जनार्दन अप्पा पेंढारे (४७) यांची हत्या करण्यासाठी संशयित आरोपी समाधान दौलत भड (३७, मूळ रहिवासी पळाशी, ता. नांदगाव, हल्ली रा. ढेकू) यास सुपारी दिली होती. जनार्दन अप्पा पेंढारे हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने त्यांच्या मानसिक विकृतपणापासून कायमची सुटका मिळण्यासाठी समाधान दौलत भड यास पंधरा हजार रुपयांची सुपारी देण्यात आली. सदर संशयिताने दि. ७ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जनाबाई अप्पा पेंढारे यांच्या घरातील लोखंडी पहारीने जनार्दन यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारले. त्याचा मृतदेह निळ्या रंगाच्या प्लास्टिक गोणीमध्ये भरून गोणीचे तोंड शिवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्थानिक शेतातील विहिरीत फेकून दिला. स्थानिक शेतकऱ्यांना मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेचा तपास करण्यात आला.
इन्फो
काही वेळातच पोलिसांनी लावला छडा
पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक सुरवडकर व पाटील, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, हवालदार सांगळे व गांगुर्डे, पोलीस शिपाई बागुल व पवार आदींसह पोलीस पथक दाखल झाले. पोलीस पथकाने आपल्या विलक्षण चातुर्याने अवघ्या काही वेळातच आरोपींचा छडा लावला. घटनेतील संशयित आरोपी समाधान दौलत भड व जनाबाई अप्पा पेंढारे यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. दोघांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.