नाशिकमध्ये भर रस्त्यात ‘बर्निंग ई-बाइक’चा थरार; 'फायर एक्स्टिंग्युशर’चा वापर करत नागरिकांनी दाखविले प्रसंगावधान
By अझहर शेख | Published: September 29, 2022 04:27 PM2022-09-29T16:27:14+5:302022-09-29T16:27:57+5:30
नाशिक : गंगापुररोडवरील विद्याविकास सर्कलजवळ गुरूवारी (दि.२९) दुपारी एक वाजताच्या सुमारास रस्त्यालगत फुटपाथजवळ उभी असलेली ई- बाईक अचानकपणे पेटली. ...
नाशिक : गंगापुररोडवरील विद्याविकास सर्कलजवळ गुरूवारी (दि.२९) दुपारी एक वाजताच्या सुमारास रस्त्यालगत फुटपाथजवळ उभी असलेली ई-बाईक अचानकपणे पेटली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ‘बर्निंग इ-बाइक’च्या थरारामुळे गंगापुररोड परिसरात एकच धावपळ उडाली. आजुबाजुच्या व्यावसायिक, बँक कर्मचाऱ्यांनी ‘फायर एक्स्टिंग्युशर’घेऊन पेट घेणाऱ्या दुचाकीवर पाॅवडर फवारली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत पेटलेली दुचाकी विझविण्यास नागरिकांना यश आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रीक बाइकला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. इलेक्ट्रीक बाइकमध्ये शॉर्टसर्किट हाेऊन पेट घेण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे. नाशिक शहरामध्ये यापुर्वीही इमारतीच्या वाहनतळांत अशा घटना घडल्या आहेत. गुरुवारी रवींद्र आव्हाड हे त्यांच्या ई-बाइक ने काही कामासाठी गंगापुररोडवर आले. त्यांनी दुचाकी तेथे फुटपाथाजवळ उभी करून दुकानांमध्ये खरेदीसाठी गेले. यावेळी अचानकपणे बाइकमधून धूर येऊ लागला.
यावेळी त्यांनी आजुबाजुच्या व्यावसायिकांना मदतीचे आवाहन केले. फायर एक्स्टिंग्युशरद्वारे व्यावसायिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र बाईकमध्ये लागलेली आग विझण्याऐवजी अधिकच वेगाने वाढु लागली. यामुळे लोकांनी ती दुचाकी अन्य दुचाकींपासून बाजुला करत रस्त्यावर आणली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दुचाकीवर अजून जास्त प्रमाणात पॉवडरचा मारा सुरु केला अन् अखेर दुचाकीची आग विझविण्यास नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले.
नाशिकमध्ये भर रस्त्यात ‘बर्निंग ई-बाइक’चा थरार; 'फायर एक्स्टिंग्युशर’चा वापर करत नागरिकांनी दाखविले प्रसंगावधान#nashiknewspic.twitter.com/qv8kqyjAGr
— Lokmat (@lokmat) September 29, 2022
याचवेळी एका बँकेच्या कर्मचाऱ्याने अग्निशमन मुख्यालयाला घटनेची माहिती कळविली. शिंगाडा तलाव येथून गंगापुररोडवरील घटनास्थळी बंब पोहचेपर्यंत दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले, तोपर्यंत दुचाकीची आग विझलेली होती, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली.