----------------------
दारणा नदीपात्रात युवक बुडाल्याची भीती
सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात कृषीपंप सुरू करण्यासाठी नदीकाठी गेलेला युवक दारणा नदीपात्रात बुडून बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऋषिकेश एकनाथ वीर (२२) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. युवकाच्या वडिलांनी नदीपात्रात उडी घेत मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही तरुण न सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
----------------------
समृध्दी महामार्गाखालून बोगदा देण्याची मागणी
सिन्नर : तालुक्यातील दुशिंगपूर शिवारात पाझर तलावातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे वहीवाटी रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या खालून शिवार रस्त्यालगत बोगद्याची व्यवस्था करावी, तसेच बंधाऱ्यात संरक्षक भिंतीचे बांधकाम करू नये, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा दुशिंगपूर शिवारातील बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
------------------
माळेगाव येथील कामगाराचा मृत्यू
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या २० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष मोतीलाल साहनी (२०) असे मृत कामगाराचे नाव आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार एका खोलीत राहतात. पहाटे स्वयंपाक करण्यासाठी त्याला सहकारी मित्र उठवत असताना तो झोपेतून उठाला नाही. घटनेची खबर एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------------------
दोन दुचाकींच्या धडकेत चालकाचा मृत्यू
सिन्नर : सिन्नर-नायगाव रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात ओझरमिग येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ओझरमिग येथील तानाजी एकनाथ चौधरी (६३) व त्यांची पत्नी गयाबाई हे दोघे दुचाकीने सिन्नरकडे येत असताना देशवंडी शिवारात समोरुन येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुुचाकीला सकाळी अकराच्या सुमारास धडक दिली. त्यात तानाजी चौधरी यांचा मृत्यू झाला, तर पत्नी गयाबाई जखमी झाल्या.
-------------------------
मनेगाव शिवारातील जनावरांची चोरी
सिन्नर : तालुक्यातील मनेगाव शिवारातून अज्ञात चोरट्यांनी जनावरांची चोरी केली. येथील तानाजी चौकातील योगेश देशमुख यांच्या मालकीची ८ वर्षे वयाची सफेद रंगाची खिल्लारी गाय, गोऱ्हा व वासरू चोरुन नेले. यात शेतकऱ्याचे सुमारे ४२ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.