नाशिक : शहरात दरदिवसाआड सोनसाखळी चोरीच्या घटना कुठे ना कुठे घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या असल्या तरी अद्याप शहरात जरब निर्माण झालेली नाही. इमारतीच्या वाहनतळात खुर्चीवर बसलेल्या एका ८७ वर्षीय वृद्धेला पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी टार्गेट केले. जुन्या सायखेडा रस्त्यावरील पिंटो कॉलनीत शनिवारी (दि.२८) सुलोचना विठ्ठल जाधव या ज्येष्ठ महिला वाहनतळात खुर्चीवर बसलेल्या असताना भरदुपारी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी जाधव या वाहनतळात खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्यावेळी दोघे इसम पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या इमारतीच्या वाहनतळाजवळ थांबले. यावेळी एकाने तत्काळ त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी खेचून दुचाकीवर बसून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुचाकीस्वार चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले असून, पोलीस सदर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खडके हे पुढील तपास करीत आहेत.काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने सकाळी आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथे इमारतीजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली होती. नागरिकांच्या घराजवळ येऊन चोरटे महिलांना लक्ष्य करत असल्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुन्हा सोनसाखळी चोरीचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:13 AM