तहसील कचेरीजवळून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:29+5:302021-01-08T04:44:29+5:30
---- शेतीच्या वादावरून तळवाडेत हाणामारी मालेगाव : तालुक्यातील तळवाडे येथे देवळाणे रस्त्यावर बाळू कुंवर यांचे शेतात हाणामारी झाली असून, ...
----
शेतीच्या वादावरून तळवाडेत हाणामारी
मालेगाव : तालुक्यातील तळवाडे येथे देवळाणे रस्त्यावर बाळू कुंवर यांचे शेतात हाणामारी झाली असून, या प्रकरणी बाळू कोंडाजी कुंवर, कोंडाजी पर्वत कुवर, पुष्पकराज बाळू कुंवर, कल्पेशराज बाळू कुंवर, विजय बाळू कुंवर, प्रियतमा बाळू कुंवर सर्व रा. तळवाडे शिवार यांच्याविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. महेंद्र केदा उर्फ बापू पवार यांनी फिर्याद दिली. ३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तळवाडे शिवारात सामाईक बांधावरून झालेल्या वादातून हाणामारी झाली. यात आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
----
मालेगाव कॅम्प रोडवरून दुचाकी चोरीस
मालेगाव : शहरातील कॅम्प रोडवर दूधविक्रीच्या दुकानाशेजारून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ क्यु ७९५८ चोरून नेली. महेंद्र शालीग्राम सावंत (४२) रा. आघार बुद्रुक यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. २८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
----
३८ लाख ४३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा
मालेगाव : यंत्रमाग कारखान्यासाठी लागणारे सूत उधार घेऊन, बिलापोटी दिलेला ३८ लाख ४३ हजार ३२२ रकमेच्या धनादेशाद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी नाहीद कौसर मोहंमद अजहर रा. स. नं. २१५/१, प्लॉट नं. ७२, हकीमनगर याचे विरोधात आझादनगर पोलिसात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुधीर गंगाभिसन कलंत्री (५५) रा. २६०, मंगळवार वॉर्ड, नेहरू चौक यांनी फिर्याद दिली. २०१७ ते आजपावेतो ही घटना घडली. आरोपी नाहीद कौसर हे मे. ओयासीस टेक्सटाइल्सचे प्रोप्रायटर असून, त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून, त्यांच्याकडून २०१७ पासून आजपर्यंत यंत्रमाग व सायझिंगसाठी लागणारा सूत वेळोवेळी उधार घेतले. बिलापोटी आरोपीने फिर्यादीस मे. ओयासीस टेक्साटाइल कंपनीच्या नावाचे ३८ लाख ४३ हजार ३२२ रकमेचे धनादेश दिले. धनादेश वटविण्याकरिता फिर्यादी सुधीर कलंत्री यांनी बँकेत टाकले असता ते वटले नाहीत. आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड करीत आहेत.
-----
गोल्डननगर शाळेजवळ हाणामारी
मालेगाव : शहरातील गोल्डननगर मॉर्डन शाळेजवळ पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सर्जील रा. काली खोली व रेहान रा. सरदारनगर (पूर्ण नाव माहीत नाही) यांचे विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अलीम शेख सलीम (१६) रा. सिद्धिकी सायझिंगजवळ यांनी फिर्याद दिली. १ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अलीम शेख हा मित्रांसमवेत बसलेला असताना आरोपींनी त्याच्याकडे पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने, मारहाण करून कटरने फिर्यादीच्या पाठीवर, कमरेवर वार करून जखमी केले. अधिक तपास पोलीस नाईक पाडवी करीत आहेत.