-------
(झाकीर हुसेन दुर्घटना-विशेष पानासाठी)
अझहर शेख,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘हमारे अब्बू को ॲडमिट किये हुये, तीन दिनही हुये थे, लेकिन उनकी हालत काफी सुधर रहीं थी, डॉक्टरभी बोले की दो दिन बाद डिस्चार्ज मिल जायेंगा, उनका ऑक्सिजन सॅच्युरेशन भी अच्छा हुवा था... लेकिन अचानक ये हादसा हुवा और सब कुछ खत्म...! सिलिंडर लाने-लेजाने तक जो वक्त गुजरा उसमे अब्बू हमेशा के लिये हमें छोड के चले गये....! या भावना त्यांच्याच शब्दांत दुर्घटनेचे बळी ठरलेले भय्या सांडूभाई सय्यद यांच्या कुटुंबीयांच्या आहेत.
येथील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात महिनाभरापूर्वी बुधवारी (दि. २१) दुपारी अचानकपणे ऑक्सिजन टाकीला गळती लागली अन् अनर्थ घडला. रुग्णालयात मृत्यूच्या तांडवासोबतच नातेवाइकांचा सुन्न करणारा आक्रोश सुरू झाला. यावेळी सय्यद यांची दोन्ही मुले नदीम व साहील तसेच त्यांचे मित्र मुस्तकीम कुरेशी, ताबीश सय्यद, मोईन शेख, सकलेन शेख, इरफान कुरेशी यांनीही दुचाकींनी धावाधाव करीत घरी असलेला निम्मा भरलेला ऑक्सिजन सिलिंडर तसेच गॅरेजमधील एक असे दोन सिलिंडर तत्काळ रुग्णालयात आणले. भय्या सांडूभाई सय्यद (५९, रा. रॉयल कॉलनी, पखाल रोड) यांना ऑक्सिजन लावला. हे दोन्ही सिलिंडर निम्मेच असल्यामुळे ते लवकर संपणार असल्याने हे तरुण पुन्हा सातपूर औद्योगिक वसाहतीकडे धावले. तेथून पुन्हा रुग्णालयात येईपर्यंत वेळ लागला आणि यादरम्यानच ऑक्सिजनचा दाब कमी होत गेल्याने सय्यद यांचा श्वास कायमचा थांबला. ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
----इन्फो----
आमचा आधारवड हरपला
अत्यंत मध्यमवर्गीय असलेल्या सय्यद कुटुंबीय मूळ गाव येवला तालुक्यातील राजापूर येथील. कुटुंबप्रमुख भय्या सय्यद हे ड्रायव्हर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. आमचा आधार या दुर्घटनेने कायमचा हिरावून नेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. वडिलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, नियतीने त्यांच्या प्रयत्नांना अखेरपर्यंत यश येऊ दिले नाही.
---इन्फो--
....अन् ती महिला रुग्ण बचावली!
‘दुसरा सिलिंडर लेके हम हॉस्पिटल में पहुंचे तब हमारे अब्बू रुख्सत हों चुके थे, और वॉर्ड में दुसरे बेड पें लेटी लेडीज पेशंट की सांसे छूटने लगी थी. ये देखकर तुरंत हमने वो सिलिंडर वो पेशंट को दे दिया और उसकी जान बच गयी.’ हा प्रसंग नदीम व साहील या भावंडांनी बोलून दाखविला. आपल्या वडिलांना गमावल्याचे दु:ख असतानाही, दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचावेत, या भावनेतून त्यांनी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दाखविलेले प्रसंगावधान त्या महिला रुग्णाला जीवदान देणारे ठरले.
फोटो : nsk वर भैय्या सैय्यद नावाने सेंड केला आहे.