वावी येथे किराणा दुकानावर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 04:43 PM2019-07-03T16:43:55+5:302019-07-03T16:46:22+5:30
वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे बसस्थानक परिसरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करीत सुमारे रोख १२ हजार रुपयांसह दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मुख्य बाजारपेठेत असलेले किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याने दहशत निर्माण झाली आहे.
मुख्य बाजारपेठेत योगेश पाचपाटील यांचे भोलेहर किराणा अँड जनरल स्टोअर्स या नावाने किराणा दुकान आहे. बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास काही ग्रामस्थांना दुकानाचे शटर तोडलेल्या अवस्थेत दिसले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने दुकानाचे पूर्वेकडील बाजूचे शटर उचकवून आता प्रवेश केला. आतील सामानाची उचक पाचक करून गल्ल्यात असलेली चिल्लरसह बारा हजारांची रक्कम लांबवली.चोरट्यांनी साखर, शेंगदाण कट्टा, साबण व गोडेतेलाचे बॉक्स, बिस्किटांचे बॉक्स, खारीक-खोबरे, काजू-बदाम असे १२ हजार रुपये व सुमारे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे किराणा साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले. दुकानात विक्र ीसाठी ठेवलेले २५ हजार रु पयांचे मोबाईल फोन देखील चोरून नेले. याच दुकानाच्यासमोर असणाऱ्या प्रकाश कासार यांच्या संजीवनी इलेक्ट्रीकल या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. चोरीसाठी चार चाकी वाहनाचा वापर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस हवालदार संदीप शिंदे, सुधाकर चव्हाणके, नितीन जगताप यांनी घटनेचा पंचनामा केला. वावी गावात पोलिसांकडून रात्रीच्या वेळी नियमित गस्त घातली जावी अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी केली आहे.