सिन्नर : तालुक्याच्या दुशिंगपूर (वावी) येथील पोल्ट्री शेडची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी कोंबड्यांच्या अंड्यांनी भरलेले ७०० ट्रे चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास घडली. यात २१ हजार अंड्यांची चोरी झाली असून, शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून वावी परिसरातील पोल्ट्री शेडमधून अंडी चोरी करण्यास प्रारंभ केल्याने शेतकरी धास्तावले आहेत.वावी येथील व्यावसायिक राजेंद्र लक्ष्मीनारायण भुतडा यांचे दुशिंगपूर शिवारात पोल्ट्रीचे तीन शेड आहेत. त्यापैकी एका पोल्ट्रीच्या गोडाउनची लोखंडी जाळी चोरट्यांनी कापली. या शेडमध्ये अंडी भरलेले ७०० ट्रे चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या वाहनात भरून नेले. रात्री १२ वाजेपर्यंत पोल्ट्री शेडवरील कामगार पोल्ट्रीत होते. रात्री ते झोपण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी शेडवर येऊन अंड्यांचे ट्रे चोरून नेले. पोल्ट्री शेडचा सुपरवायझर सकाळी उठल्यानंतर त्याच्या दरवाजाची कडी बाहेरून लावलेली होती. त्याने फोन करून कामगारांना दाराची कडी उघडण्यास लावली. त्यानंतर सुपरवायझर आणि कामगार अंड्यांच्या गोडाउनकडे गेल्यानंतर त्यांना जाळी कापलेली आणि शेडमधील अंड्यांचे ट्रे नसल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांचा ‘अंडे का फंडा’भुतडा यांचे तीन मोठे पोल्ट्री शेड असून, एका शेडमध्ये साडेआठ हजार, तर उर्वरित दोन शेडमध्ये साडेसात व पाच हजार कोंबड्या आहेत. त्यामुळे दररोज हजारो अंडी मिळतात. सदर अंडी ट्रेमध्ये भरल्यानंतर ते व्यापाऱ्यांच्या गाड्या आल्यानंतर पुणे, निफाड, विंचूर व कोपरगाव या परिसरात पाठवले जातात. मात्र चोरट्यांनी या २१ हजार अंड्यांवर डल्ला मारल्याने भुतडा यांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात घोटेवाडी रस्त्याला नवनाथ यादव यांच्या पोल्ट्री शेडमधूनही अज्ञात चोरट्यांनी अंड्यांचे ट्रे चोरून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांचा हा अंडे का फंडा मात्र पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंता वाढवत आहे.
वावी येथून चोरट्यांनी लांबवली २१ हजार अंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 1:05 AM