तिसऱ्या दिवशीही गर्दीच

By admin | Published: November 12, 2016 09:25 PM2016-11-12T21:25:44+5:302016-11-12T21:58:21+5:30

मालेगाव : पैसे न मिळाल्याच्या धसक्याने इसमाचा मृत्यू

Third day rally | तिसऱ्या दिवशीही गर्दीच

तिसऱ्या दिवशीही गर्दीच

Next

मालेगाव / आझादनगर : पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी विविध बँक शाखांबाहेर व एटीएम केंद्रांवर उच्चांकी गर्दी होती. शुक्रवारी दिवसभर रांगेत उभे राहूनही पैसे न मिळाल्यामुळे शहरातील मिरादातारनगर भागात राहत असलेल्या इसमाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर शुक्रवारी रात्री शहरात मीठ व साखरेचे दर वाढल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने नागरिकांनी किराणा दुकानांमध्ये साखर व मीठ खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले होते.गेल्या मंगळवारपासून शहरातील व्यवहार चलनाअभावी ठप्प झाले आहेत. शहरातील सर्वच बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी विक्रमी गर्दी होत आहे. तब्बल अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत नागरिक रांगा लावत आहेत. शुक्रवारी आठवडे बाजार व यंत्रमाग व्यवसायाला सुट्टी असल्यामुळे सुमारे ७० ते ८० कोटी रूपयांची नोटांची अदलाबदल करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर पैसे काढण्यासाठी येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेबाहेर रांगेत उभे राहूनही शेख अलाउद्दीन शेख शहाबुद्दीन (५२) रा. मिरादातारनगर या यंत्रमाग कामगाराला पैसे मिळाले नाहीत. याचा धसका घेतल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर शुक्रवारी रात्री शहरात मीठाचे व साखरेचे दर वाढल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी किराणा दुकानांमध्ये मीठ व साखर खरेदीसाठी झुंबड केली होती तर या अफवेचे सोने करण्याची संधी साधत काही दुकानदारांनी चढ्या दराने मीठ व साखरेची विक्री करत सर्वसामान्यांची आर्थिक लुट केली. पोलीसांनी शहरात गस्त वाढविली होती तसेच पोलीस वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाद्वारे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. मीठ व साखरेचे दर बाजार भावा प्रमाणेच असल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी किराणा दुकानांजवळ गर्दी केली होती. यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार व बळाचा वापर करीत गर्दीला हटवले होते. शहरालगतच्या टेहरेशिवारात किराणा मार्केट आवारातून मीठाच्या गोण्या चोरीला गेल्याचे प्रकारही झाला.
शनिवारचा दिवस उजाडल्यानंतर विविध बँकांच्या शाखांबाहेर गर्दीचा विक्रम कायम होता. सकाळपासूनच नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती. येथील मुख्य पोस्ट कार्यालयात शनिवारी दिवसभर एक कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी चार हजार रूपये देण्यात येत होते. पोस्ट प्रशासनाकडून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना पाणी व चॉकलेटचे वाटप केले जात होते. एकाच ओळखपत्रावर वारंवार नोटा बदलणाऱ्यांची संख्या अधिक दिसून आली. यामुळे गर्दी ओसरत नव्हती. उद्या रविवारीही पोस्ट कार्यालयात नोटा बदलून देणार असल्याची माहिती आर. एन. मोरे यांनी दिली.(वार्ताहर)

Web Title: Third day rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.