नाशिक- जिल्ह्यात केारोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा आटापीटा करीत असतानाच आज एकाच दिवसात तब्बल १३३० रूग्ण आढळले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे नाशिककरांची चिंताही वाढली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकुण १३३० रूग्ण आढळले असून त्यात ७६८ रूग्ण केवळ नाशिक शहरात आढळले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३८७ रूग्ण आढलले असून १३८ मालेगावात तर जिल्हा बाह्य ३७ रूग्णांचा समावेश आहे. तर चोवीस तासातच सहा रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन तर नाशिक शहरात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या २ हजार १५५ झाली आहे. आज दिवसभरात ५४९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात केारोना बाधीतांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध शिथील केले होते. मात्र त्यानंतर आराेग्य नियमांचे पालन येाग्य पध्दतीने न झाल्याने संसर्ग पुन्हा वाढु लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागु करावे लागले आहे. काल एकाच दिवसात ९ रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात नाशिक शहरातील चार रूग्णांचा समावेश होता. गेल्या काही दिवसात प्रथमच कोरोना बळींची संख्या इतकी झाली हेाती. आज मात्र बळींची संख्या कमी झाली असली तरी बाधीतांच्या संख्येने हजारचा टप्पा ओलांडल्याने चिंतेचे वातावरण आहे.