नाशिक : कोरोनामुळे टाळेबंदी आणि गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लागू करण्यात असलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असतानाच आता ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या कालावधीतही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी थर्टी फर्स्ट आल्याने अशा विविध निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांसमोरील अडचणीत वारंवार वाढ होत आहे. त्यामुळे, यापुढील काळात पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्हा हॉटेल्स, बार असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
राज्यातील विविध शहरे व जिल्ह्यांत रोज नवे रुग्ण आढळत असल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन, संचारबंदी व अधिक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारतर्फेही पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारसारख्या व्यवसायातील अर्थकारण बिघडत आहे. त्यामुळेच दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन असतानाही संसर्ग थांबू शकलेला नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न हॉटेल व्यवसायातील कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत. सध्या नाशिकमध्ये हॉटेल व्यावसायिकांना केवळ रात्री ९ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी असून, दहा वाजता हॉटेल्स बंद करावी लागतात. त्यामुळे ग्राहक येण्याच्या वेळीच हॉटेल्स बंद करावी लागत असल्याने व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांमध्ये उमटत आहे.
कोट-१
कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे व्यावसायिकांना हॉटेल कामगारांचे वेतन, वीज बिल, पाणी बिल, देखभाल खर्च, जागेचे भाडे आदी खर्च भागविणे शक्य होत नसल्याने जवळपास शहरातील ४० टक्के हॉटेल्स बंद पडले आहेत. त्यामुळे यापुढील काळात पूर्वीप्रमाणे रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची गरज आहे.
-संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा हॉटेल, बार असोसिएशन.
इन्फो-१
शुल्कमाफीच्या निर्णयाने अल्प दिलासा
कोरोनाकाळातील टाळेबंदी आणि निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असल्याने संपूर्ण परवाना शुल्क माफ करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. मात्र, शासनाने ५० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल चालकांच्या संघटनेकडून होत आहे.