विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी,टाळ-मृदंगाचा गजरात हजारो भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:05 PM2018-01-09T16:05:40+5:302018-01-09T16:17:14+5:30
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी (दि.12) होत असून, त्यासाठी नाशिक शहर मार्गे दिंडय़ा-पताकांसह हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होत असल्याने कुंभनगरी नाशिकच्या रस्त्यांवर टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष होत आहे
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे भरणारी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी (दि.12) होत असून, त्यासाठी नाशिक शहर मार्गे दिंडय़ा-पताकांसह हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होत असल्याने कुंभनगरी नाशिकच्या रस्त्यांवर टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष होत आहे. या दिंडय़ा बुधवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असून, पौष वद्य एकादशीच्या दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी त्र्यंबकनगरीत संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांची यात्रा भरणार आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या दिंडय़ांचे नाशिक शहरात स्वागत करण्यात येत आहे. सिन्नर, श्रीरामपूर, अहमदनगर या भागातून आलेल्या दिंडय़ांनी शिंदे, पळसे, नाशिकरोड, सिडको, सातपूर येथे तर कळवण, सटाणा, देवळा या भागातून येणाऱ्या दिंडय़ा शहरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये विसावल्या आहेत. तर काही दिंडय़ा मंगळवारी पहाटेच त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाल्या असून, या दिंडय़ा बुधवारी यात्रास्थळी पोहचतील. तर काही दिंडय़ा गुरुवारर्पयत त्र्यंबकेश्वरमध्ये पोहचणार असल्याने शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमध्ये वैष्णवांचा मेळा अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मुक्कामी राहिलेल्या दिंडय़ांचे स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांच्या फराळाची व निवासाची व्यवस्था केली आहे. यात्रेसाठी संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर ट्रस्टतर्फे व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे यात्रेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, यावेळी निर्मळवारीची संकल्पना घेऊन यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने आठवडाभर नामवंत प्रवचनकार त्र्यंबकेश्वरमध्ये अखंड हरिनाम सोहळ्यासाठी हजेरी लावत असतात. संत निवृत्तिनाथ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथील मराठी भाविकही त्र्यंबकनगरीत दाखल होत असतात.
13 जानेवारीपर्यत यात्रोत्सव
त्र्यंबकेश्वरमध्ये 11 ते 13 जानेवारी या कालावधीत यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, 12 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रोत्सवासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी संप्रदाय, तसेच भाविक मोठय़ा संख्येने येतात. या यात्रेला पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ठिकठिकाणी सेवाभावी संस्थांकडून चहा व नाष्टाची सोय करण्यात येते. विशेष म्हणजे काहीजण संपूर्ण कुटुंबासह वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित राहतात.