सिन्नरजवळ कार उलटून नाशिकरोडचे तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:37 AM2018-03-31T01:37:03+5:302018-03-31T01:37:03+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर धडकून उलटल्याने नाशिकरोड येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. कारचा वेग इतका भयानक होता की कार दुभाजकावर धडकल्यानंतर हवेत फेकली गेली. त्यानंतर ती सुमारे २०० फूट लांब शेतात जाऊन पडली.
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर धडकून उलटल्याने नाशिकरोड येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. कारचा वेग इतका भयानक होता की कार दुभाजकावर धडकल्यानंतर हवेत फेकली गेली. त्यानंतर ती सुमारे २०० फूट लांब शेतात जाऊन पडली. कारमधील नाशिकरोड येथील आमेसर कुटुंबातील मायलेक व चुलती जागीच ठार झाली. सिन्नर बायपासवर गुरेवाडी फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा भयानक अपघात झाला. जेलरोड, नाशिकरोड येथे जितू राम आमेसर (३०) बेकरी व्यवसाय करतात. त्यांची आई सीमा राम आमेसर (५०) या नागपूर येथे राहतात. त्या मुलगा जितू यांच्याकडे आल्या होत्या. शिर्डी येथे दर्शनाला जाण्यासाठी चुलती वर्षा जगदीश आमेसर (४९) हे तिघे टाटा मांझा कार (क्र. एम. एच. ०४ ई. एक्स. ८६३२) घेऊन निघाले होते. नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे आल्यानंतर सिन्नर शहरातून जाण्याऐवजी ते रस्ता चुकून बायपासने संगमनेरच्या दिशेने गेले. पुढे दोन-तीन किलोमीटर गेल्यानंतर गुरेवाडी फाट्याजवळ चौफुलीजवळ चालक जितू आमेसर यांना वळणाचा अंदाज आला नाही. चौफुलीवर असलेल्या दुभाजकावर भरधाव वेगाने जाणारी कार धडकली. कारला प्रचंड वेग असल्याने ती हवेत उंच व लांब फेकली गेली. रस्त्याच्या कडेला लोखंडी बोर्डला तोडून कार शेतात २०० ते ३०० फूट लांब फेकली गेली. कार हवेत असतांनाच त्यातील तिघेही बाहेर फेकले गेले. कारने हवेत गिरक्या घेत शेतात पडल्यानंतर दोन-तीन वेळा उलटली गेली. तिघेही कारपासून सुमारे १०० ते २०० फूट लांब फेकले गेले. कारचा चक्काचूर झाला. त्यानंतर इंजिनने पेट घेतला. या भयानक अपघातात जितू राम आमेसर (३०) रा. पेंढारकर कॉलनी, पंचरत्न सोसायटी, नाशिकरोड, त्यांची आई सीमा आमेसर (५०) रा. नागपूर हल्ली नाशिकरोड व वर्षा जगदीश आमेसर (४९) रा. आनंद प्लाझा सोसायटी, प्रेसच्या भिंतीलगत, जेलरोड, नाशिकरोड हे जागीच ठार झाले. घटनास्थळी वाहनचालक व बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोतीलाल वसावे, हवालदार टी. के. कदम, तुषार मरसाळे, सुनील ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.