नाशिक : शहरासह जिल्ह्यात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून फरार होणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने काही दिवसांपुर्वी आवळल्या. सराईत गुन्हेगार सोमनाथ हिरामण बर्वे (३०,रा.मातोरी), नितीन निवृत्ती पारधी (२५,रा.फुलेनगर) आणि अनिल भाऊराव पवार (२३,रा.सय्यद पिंप्री) या त्रिकुटांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. चंदन चोरट्यांच्या टोळीनंतर शहरात सोनसाखळी चोरट्यांवर मोक्काची ही दुसरी कारवाई आयुक्तालयाकडून करण्यात आली.आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि सोनसाखळ्या हिसकावणा-या गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण व्हावा, या उद्देशाने नांगरे पाटील यांनी संघटितपणे जबरी चोरीसारखे गुन्हे वारंवार करणा-या या त्रिकुटांवर मोक्का लावला आहे. या त्रिकु टांपैकी दोघांनी मिळून २३ एप्रिल २०१९ रोजी औरंगाबाद रोडवरील एका लॉन्स समोरून पायी जाणा-या स्वाती विजय परमेश्वर (रा. पुणे) यांच्या गळ्यातील सुमारे साडे चार तोळे वजनाचे ७२ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून पेठ फाटा परिसरातून सोमनाथ बर्वे आणि नितीन पारधी यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्या दोघांना ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर त्यांनी त्यांचा सय्यद पिंप्रीमध्ये राहणारा साथीदार अनिल भाऊराव पवारच्या मदतीने शहरासह ग्रामीण भागात सुमारे नऊ जबरी चो-या केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याविरोधात यापुर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.स्पोर्टस् बाइकवरून ‘रॉबरी’त्रिकुटांकडून ७ लाख ४७ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या ९लगड जप्त केल्या आहेत. या टोळीचा प्रमुख नितीन पारधी हा सोनसाखळी ओरबाडण्यासाठी स्पोर्टस बाईकचा वापर करत होता. संघटीतपणे गुन्ह्यांचे कट रचून शहरासह ग्रामीण भागात या त्रिकुटांनी महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावण्यासाचा सपाटा लावला होता. त्यामुळे संघटित गुन्हेगारी संपविण्यासाठी नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी त्रिकुटांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का प्रस्तावित केला. त्यास मंजुरी मिळाली असून त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
तीघा सोनसाखळी चोरांभोवती आवळला ‘मोक्का’चा फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 7:33 PM
आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत.
ठळक मुद्दे७ लाख ४७ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या ९लगड जप्त जबरी चोरीसारखे गुन्हे वारंवार करणा-या त्रिकुटांवर मोक्का