शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार
By admin | Published: September 28, 2016 11:52 PM2016-09-28T23:52:38+5:302016-09-28T23:53:21+5:30
शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार
नाशिक : शहरातील महामार्ग बसस्थानक, दिंडारीरोडवरील मेरी कार्यालय व पंचवटीतील स्वामीनारायण मंदिरासमोर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२७) घडली आहे़ मृतांमध्ये एक वृद्ध महिला, दिंडोरी येथील तरुण व एका अज्ञात इसमाचा समावेश आहे़
मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकाजवळील चिंचेच्या झाडाजवळ लावलेली कार (एमएच ०४, एई ५१८९) पार्किंगमधून काढत असताना ती जोरात मागे-पुढे घेतली़ यामुळे कारच्या डाव्या बाजूस बसलेल्या जनाबाई रामजी राठोड (७५, रा़ पंचवटी, नाशिक) या वृद्धेस जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी कारचालक किशोर बनकर बर्गे (५३, रा़ दोस्ती विहार, बिल्डिंग नंबर २, बी़ विंग /२२७, वर्तकनगर, ठाणे) विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अपघाताची दुसरी घटना दिंडोरी रोडवरील मेरी कार्यालयासमोर घडली़ मेरी वसाहतीकडून मेरी सिग्नलकडे विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या होंडा प्लेझर दुचाकीचालकाने (एमएच १५, ईडब्ल्यू ९६१०) समोरून येणाऱ्या टीव्हीएस व्हिक्टर दुचाकीस (एमएच ३१, बीके १५७३) धडक दिली़ यामध्ये या दुचाकीवरील मुकेश महादेव रामटेककर (३४, रा़ टिटवे, दिंडोरी) यांचा जागीच मृत्यू झाला़ याप्रकरणी प्लेझर गाडीच्या चालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अपघाताची तिसरी घटना पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरासमोर मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली़ मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावकडून द्वारकाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १८, एसी २५६८) दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला़ या मयत इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ दरम्यान, याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र बिरेंद्र तिवारी (४०, रा़ जुने धुळे, जैन मंदिरासमोर, धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़