वाडीवऱ्हेनजीक भीषण अपघातात तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 11:14 PM2021-03-03T23:14:30+5:302021-03-04T01:12:10+5:30
वाडीवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावर मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी ट्रक दुभाजक तोडत समोरुन येणाऱ्या आयशरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात ट्रकचालक, क्लिनर व आयशरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा क्लिनर जखमी झाला. सदर अपघात बुधवारी (दि.३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेनजीक घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून त्यांच्यातील साहित्य रस्त्यावर इतस्तत: विखुरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

नाशिककडून ट्रक (एमएच १५ डीके-२३५५) तांदूळ घेऊन मुंबईच्या दिशेने जात असतांना वाडीवऱ्हे फाट्यानजीकच्या पेट्रोल पंपासमोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक दुभाजकाच्या तारा तोडत मुंबईहून नाशिकच्या दिशेने काचाचे तुकडे घेऊन येणाऱ्या आयशर (क्र. एमएच ०४ जेयू -३९८६) या वाहनावर आदळला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर झाला.
मृतात ट्रकचालक वीरेंद्रसिंग डुंगरसिंग परिहार, क्लिनर मोरपाल व आयशरचालक जितेंद्र यादव यांचा समावेश आहे. तसेच आयशरचा क्लिनर अस्लम खान हा गंभीर जखमी झाला असून या तिघांना जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविले. समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातात ट्रकचे तुकडे झाले असून त्यातील तांदळाचे कट्टे रस्त्यावर विखुरले, तर आयशरमधील काचासुद्धा इतरत्र पसरल्या होत्या. त्यामुळे एका बाजूची वाहतूक काही काळ खोळंबली होती.
महामार्ग आणि वाडीवऱ्हे पोलिसांनी तत्काळ वाहने एकाच मार्गाने वळवली तसेच खासगी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही ट्रक बाजूला करण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.