नाशिकमध्ये वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 02:01 PM2021-05-19T14:01:54+5:302021-05-19T14:02:25+5:30
दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत आडगाव, पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक : परिसरातील आडगाव तसेच पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत आडगाव, पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतधाम चौफुली येथे झालेल्या अपघातात औरंगाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून कंटेनरने धडक दिली. या अपघातात कंटनेरचालक ठार झाला तर क्लिनर जखमी झाला आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर (टी.एस ११ युसी ६२६१) उत्तर प्रदेश येथील चालक मनोजकुमार(२२) हा मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या अमृतधाम चौफुलीवरून वळण घेत तारवालानगरकडे जात असताना त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. कंटनेर ट्रकवर पाठीमागून आदळला त्यात मनोजकुमार याच्या डोक्याला हातापायाला गंभीर मार लागल्याने मयत झाला तर क्लिनर सलुमुद्दीन कुतुबुद्दीन खान हा जखमी झाला आहे. अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत स्वत:च्या मृत्युस व क्लिनरच्या दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मनोजकुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या अपघातात आडगाव शिवारात घडला. सोमवारी साडे आठ वाजता मालेगाव येथे राहणारे देविदास धर्मा उशीर (३८) शिर्के कंपनीकडून हॉटेल मिरचीकडे पायी चालत जात असताना पाठीमागून भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच १५ डीके १३४३) जबर धडक दिली. त्यात देविदास गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत चालक संशयित जनार्दन दत्ता काशिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.