--------
नाशिक : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून, मंगळवारी (दि.१३) संपूर्ण जिल्ह्यात तीन हजार ३४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी नाशिक शहरांमध्ये १ हजार ८५३, तर ग्रामीण भागात १ हजार ३६९ आणि मालेगाव महापालिका हद्दीत १११ नवे रुग्ण सापडले. दिवसभरात एकूण ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ४,०२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शहरामध्ये नाशिक महापालिका आरोग्य प्रशासनाकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसेच पोलीस प्रशासनदेखील रस्त्यावर उतरले आहे. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी अद्यापही काही नागरिक सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावताच वावरत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठांवरदेखील निर्बंध लावण्यात आलेले आहे. तसेच धार्मिक सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांवर ही बंदी घालण्यात आली आहे; मात्र अजूनही नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
नाशिक शहरात आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांचा आकडा १ लाख ४५ हजार ६५ इतका झाला आहे, तर जिल्ह्यात २ लाख ३६ हजार ९७२ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. शहरात १ हजार २८१ रुग्ण आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत, तर जिल्ह्यात बळींचा आकडा २ हजार ७५२ इतका झाला आहे. यामध्ये मालेगावात आतापर्यंत २२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाबाह्य ८८ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत. एकूण ८ हजार ४२८ कोरोना नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये शहरातील ३ हजार ६५३ अहवालांचा समावेश आहे. दिवसेंदिवस प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढू लागली आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार २३४ नवे संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.