नाशिक : उपनगर सिग्नलजवळ पुणे महामार्गावर एका बलिनो कारने (एम.एच ४६ ए.बी००६९) अचानकपणे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घेतला. सुदैवाने कारमधून चालक कुटुंबियांसह सुखरूप बाहेर पडल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नाशिकरोड केंद्रावरील जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. कारवर पाण्याचा मारा करत आग विझविली. आग इतकी भीषण होती की यामध्ये जळून कार बेचिराख झाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.
द्वारका बाजूने नाशिकरोडकडे जात असताना उपनगर सिग्नलजवळ अचानकपणे कारने पेट घेतला. क्षणर्धात कार संपुर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. नाशिकरोड केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मेगा बाऊजर बंबाच्या सहाय्याने मोटारीवर पाण्याचा मारा करत आग विझविली. यावेळी नाशिकरोडकडे जाणारी वाहतुक खोळंबली होती. रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली होती. यामुळे उपनगर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण ठेवले. तसेच वाहतुकीवरही नियंत्रण मिळविले.
गोविंदनगर येथील रहिवाशी असलेले शशी हेमनानी हे त्यांच्या कुटुंबियांसह नाशिकरोडच्या दिशेने निघाले होते. यावेळी उपनगरजवळ त्यांच्या कारच्या खालील बाजूने इंजिनमधून आगीच्या ज्वाला येत असल्याचे काही रिक्षाचालकांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित कारच्याजवळ रिक्षा घेऊन जात चालक हेमनानी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी कार रस्त्यालगत उभी केली. यावेळी ते त्वरित सर्व हेमनानी कुटुंब कारमधून खाली उतरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तास शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.