नाशिक : उद्योग-व्यवसायावर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला तसाच तो शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे सगळे काही ठप्प झाल्याने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्धवट झाल्या तर काहींच्या अद्यापही झालेल्या नाही. सगळे काही अधांतरी असताना करिअरच्या ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही चिंताक्रांत आहेत. यामुळेच लोकमत पाठशाला आणि कॅम्पस क्लबतर्फे ‘प्रतिकूल परिस्थितीतील संधी’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांसाठीही हा वेबिनार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बुधवारी (दि. २०) दुपारी ४ वा. हा लाईव्ह वेबिनार होणार असून,यामध्ये ‘सुपर ३०’फेम आनंद कुमार यांच्यासह भुवनेश्वर येथील जिंदगी फाउण्डेशनचे संचालक अजय बहादूर तसेच दिल्ली येथील सुमित फाउण्डेशनच्या संस्थापक संचालक मोना पुरी संवाद साधणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने, लॉकडाउननंतरचे शिक्षण क्षेत्र कसे असेल, विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यावरील उपाय काय, येणारी परिस्थिती प्रतिकूल असेल की अनुकूल, येत्या काळासोबत कोणत्या नव्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होऊ पाहत आहेत, यासारख्या अनेक विषयांवर तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक आहे. यासाठी इच्छुकांनी ँ३३स्र२://ु्र३.’८/2९ऌा६६ङ्म या लिंकवर जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी ९५४५९८११५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
‘सुपर ३०’फेम आनंद कुमार देणार टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 9:38 PM