सराफबाजारातील उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:26 AM2019-08-06T01:26:11+5:302019-08-06T01:26:44+5:30

रविवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग थेट ३६ हजारांपर्यंत वाढविला गेला. दुपारपर्यंत हा विसर्ग ४५ हजारांपर्यंत पोहोचल्याने गोदावरीला महापूर आला. या महापुराने गोदाकाठालगत असलेल्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या.

 Trading in the bull market | सराफबाजारातील उलाढाल ठप्प

सराफबाजारातील उलाढाल ठप्प

Next

नाशिक : रविवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग थेट ३६ हजारांपर्यंत वाढविला गेला. दुपारपर्यंत हा विसर्ग ४५ हजारांपर्यंत पोहोचल्याने गोदावरीला महापूर आला. या महापुराने गोदाकाठालगत असलेल्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. सोमवारी (दि.५) बाजारपेठा पुराच्या चिखलातून सावरू शकल्या नव्हत्या. प्रामुख्याने सराफबाजार, भांडीबाजार, कापडबाजार, नेहरू चौक येथील दुकाने पाण्याखाली गेली होती. व्यावसायिक दिवसभर दुकानांमध्ये साचलेल्या पाण्याचा उपसा करताना दिसून आले. तसेच मनपाच्या वतीने जेसीबीद्वारे चिखल काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पहावयास मिळाले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळ‘धार’ सुरू होती. त्यामुळे धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. परिणामी गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात रविवारी विसर्ग करण्यात आल्याने महापुराचे पारंपरिक पर्जन्यमापक असलेली नारोशंकर मंदिरावरील घंटा बुडाली होती. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून धोक्याच्या पातळीपेक्षा कितीतरी अधिक पटीने उंच वाहत होती. परिणामी नदीच्या दोन्ही काठावर हाहाकार माजला. व्यावसायिकांची दुकाने, घरे पाण्याखाली गेली. अनेकांचा संसार वाहून गेल्याने उपासमार व बेघर होण्याची वेळ आली. नदीकाठालगतचे रहिवासी, व्यावसायिक सोमवारी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले. महापुराचा फटका सर्वाधिक आनंदवली, गंगापूररोड, पंचवटी, जुने नाशिक या गावठाण भागाला बसला. पंचवटीमधील सरदार चौकापेक्षाही पुढे पाण्याचा स्तर होता, तर जुन्या नाशकात संत गाडगे महाराज धर्मशाळा बुडाली होती. जुुन्या कुंभारवाड्यातील उतारावरील घरे पाण्याखाली होती. सोमवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने या भागातील रहिवासी, व्यावसायिक आवरासावर करताना दिसून आले. साचलेला गाळ, पाण्याचा उपसा करताना पूरबाधितांची दमछाक झाली.
प्रशासनाकडून पाण्याचे टॅँकर, जेसीबी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आनंदवली गावातही पुराच्या पाण्याने गोरगरिबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. संसारोपयोगी वस्तू घरांमध्ये साचलेल्या पाण्यातून येथील रहिवासी सुरक्षितस्थळी हलवितानाची लगबग पहावयास मिळाली.
वळचणीच्या पाण्याने घरांची स्वच्छता
जुने नाशिकमधील कुंभारवाडा, काजी गढी या भागात महापुराचा फटका बसलेल्या रहिवाशांना सोमवारी अक्षरक्ष: वळचणीच्या पाण्याने घरांची स्वच्छता करावी लागली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या भागात अत्यंत कमी दाबाने व अल्पवेळ पाणीपुरवठा केल्याची तक्रार वैशाली पवार, ज्योती कदम, शंकर परदेशी, नंदा कातोटे, मीरा सहाणे, राजेंद्र सहाणे, रमेश कुमावत यांनी केली.

Web Title:  Trading in the bull market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.