समुद्री जिवांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:21 AM2021-08-18T04:21:11+5:302021-08-18T04:21:11+5:30
येवला : समुद्री जीव सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्सची तस्करीप्रकरणी एकास मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. समुद्री ...
येवला : समुद्री जीव सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्सची तस्करीप्रकरणी एकास मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
समुद्री जैवविविधतेच्या व जागतिक वातावरण बदलाच्या दृष्टीने आवश्यक असणारे समुद्री जीव सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्सची तस्करीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून मंगळवारी (दि. १७) येवला - मनमाड रोडवर सापळा रचून योगेश रमेश दाभाडे (३८, रा. येवला, जि. नाशिक) यास मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने अटक केली.
दाभाडे याच्या घराची झडती घेतली असता समुद्री जीव सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्स, सामुद्री शंख शिंपले, जंगली कंद व वन्यजीवांच्या मृगया चिन्हे हस्तगत करण्यात आले. यापैकी बहुतांश जप्त वन्य मृगयांना भारतीय वनअधिनियम १९७२च्या शेड्युल - १ मध्ये संरक्षण प्राप्त झालेले आहे.
सदर गुन्ह्याचे धागेदोरे गुजरात व तामिळनाडू राज्यांशी जोडली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून, त्याअनुषंगाने वनविभाग पुढील तपास करत आहे.
दरम्यान, योगेश दाभाडे यास येवला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास शुक्रवारपर्यंत (दि. २०) वनकोठडी सुनावली आहे. समुद्री जीव सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्स हे बरेच लोकांकडून गुडलक चार्म म्हणून अंधश्रद्धेपोटी खरेदी केले जातात. नागरिकांनी अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.
सदर मोहीम प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नाशिक नितीन गुदगे, उपवनसंरक्षक पूर्वभाग नाशिक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मनमाड सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रा.) अक्षय म्हेत्रे, येवला (प्रा.) वनक्षेत्रातील वनकर्मचारी मोहन पवार, प्रसाद पाटील, पंकज नागपुरे, गोपाल हरगांवकर, सुनील महाले, नवनाथ बिन्नर यांनी यशस्वी केली.
(१७ येवला क्राईम)
170821\17nsk_43_17082021_13.jpg
येवला अटक केलेल्यास वनकोठडी