- एस.आर. शिंदे
पेठ (जि नाशिक) - गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी ( दि.१४) रोजी गुजरातहून नाशिककडे मशिनरी घेऊन जाणारा अवजड ट्रेलर नेहमीच्या अपघातग्रस्त वळणावर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,गुजरात कडून नाशिककडे जाणारा GJ 05 BX 2317 क्रमांकाचा ट्रेलर घाट उतरत असतांना अपघातग्रस्त वळणावरील खड्डयात कोसळला . सरळ पुढील दिशेने खडुयात पडल्याने चालक दबल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत चालकाला बाहेर काढले. यामध्ये वाहनाचा अक्षरश : चक्काचूर झाला असून अवजड मशिनरी इतस्ततः फेकली गेली आहे.
कोटंबी घाटात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही . या वळणाच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावर बुधवारी तहसिल कार्यालयात आंदोलक , तहसिलदार , पोलीस निरीक्षक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांची संयुक्त चर्चा होऊन अवघड वळणे , रस्त्यावरील खड्डे यावर तिव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या . त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अश्वासन देऊन अल्पकाळ लोटला असतांना पून्हा अपघात झाल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत