नाशिक : माध्यमिक विभागातील शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा पार पडल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेगवेगळ्या विषयांच्या सुधारित आराखड्यानुसार नमुना प्रश्नपत्रिका तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.शिक्षण विभागातर्फे या शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर बारावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांप्रमाणेच प्रश्नपत्रिका तयार करता याव्यात व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना अध्यापन करताना होण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असून, प्रशिक्षण वर्गाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या प्राध्यापकांना प्रशिक्षण कला व विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांच्या सुधारित आराखड्यानुसार शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विषय शिक्षकांना या प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. संबंधित विषय शिक्षकांनी क्रमिक पुस्तके आणण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील निवडक प्राध्यापकांना गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यस्तरावर प्रशिक्षणाच्या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षेच्या धरतीवर प्रश्नपत्रिका तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु या प्रशिक्षण वर्गाला राज्यातील सर्व शिक्षक उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे शिक्षण विभागाने मंगळवारी (दि. २३) रसायनशास्त्र व गणित आणि बुधवारी (दि.२४) भौतिकशास्त्र व जीवशास्त्र या विषयांची प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले आहे.
शिक्षकांना सुधारित आराखड्यानुसार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:03 AM