किसान रेल्वेच्या माध्यमातून १७ हजार टन मालाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:14 AM2021-04-22T04:14:37+5:302021-04-22T04:14:37+5:30
नाशिक रोड : देशातील पहिली कृषी रेल्वे गाडी असलेल्या देवळाली-दानापूर किसान रेल्वेने आतापर्यंत शंभर फेऱ्यांद्वारे १७ हजार ३३ ...
नाशिक रोड : देशातील पहिली कृषी रेल्वे गाडी असलेल्या देवळाली-दानापूर किसान रेल्वेने आतापर्यंत शंभर फेऱ्यांद्वारे १७ हजार ३३ टन नाशवंत शेती मालाची वाहतूक केली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशातील रेल्वे सेवा बंद केली होती, त्यामुळे प्रवासी, मालवाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. विशेषकरून शेतमालाची देशात टंचाई व त्याची नासधूस होऊ लागल्याने केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर किसान रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नाशिक जिल्ह्यात भाजीपाला व फळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने नाशिकच्या देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकातून
देवळाली-दानापूर किसान रेल्वे ७ ऑगस्ट सुरू झाली. या रेल्वेला देशभरात मिळालेला प्रतिसाद पाहता, देशातील अनेक भागांतून जाणारी किसान रेल्वे सुरू करण्यात आली. ऑगस्ट २०२० ते १५ मार्च २०२१ पर्यंत किसान रेलने १७ हजार ३३ टन नाशवंत शेती उत्पादने १०० फेऱ्यांमध्ये वाहून नेली. कोरोना महामारीत या गाडीद्वारे देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा या प्रमुख स्थानकांतून फळे, भाज्या तसेच आवश्यक कृषीसंबंधित वस्तूंची वाहतूक करण्यात आली. किसान रेलने महाराष्ट्रातील अनेक लहान शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन केले आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली असून त्यांचे जीवनमान, उदरनिर्वाह, समृद्धी यात वाढ केली आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढू लागल्याने देशभरात अशा किसान रेल गेल्या वर्षभरात सुरू करण्यात आल्या आहेत.