मालेगाव : देवळा- मालेगाव रस्त्यावर मेशी धोबीघाटातील वळणावर झालेल्या बस व अॅपेरिक्षा अपघातानंतर येथील परिवहन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खासगी आॅटोरिक्षांची पुढील १५ दिवस विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालेगाव विभागात आतापर्यंत सहा अॅपेरिक्षांवर कारवाई करण्यात आली.धोबीघाटात झालेल्या बस व रिक्षा अपघातात २६ जण ठार तर ३३ जण जखमी झाले. भीषण अपघातामुळे अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आल्याने परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अपघातातील मृतांच्या वारसांची व येथील सामान्य रुग्णालयातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अवैध प्रवासी वाहतुकीबाबत प्रश्न विचारले होते. याची परिवहन मंत्री परब यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई परिवहन आयुक्तांनी खासगी आॅटोरिक्षांच्या तपासणीचे फर्मान सोडले आहे. अपघाताचे कार्यक्षेत्र मालेगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांचे असल्याने त्यांनी आदेश धडकताच सहा वाहनांवर कारवाई केली. सहा वायू वेग पथके मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा व नांदगाव तालुक्यातील रस्त्यांवर कारवाईकामी तैनात ठेवली आहेत. खासगी संवर्गातील नोंदणी झालेल्या अॉटोरिक्षा प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदा वाहतूक करताना आढळल्यास थेट कारवाई केली जात आहे. अशा वाहनांचा अपघात झाला तर प्रवासी कुठल्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचा विचार करून खासगी अॅपेरिक्षांमधून प्रवास करणे टाळावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. दरम्यान प्रवासी वाहतूक करताना आढळणाºया खासगी आॅटोरिक्षांवर थेट जप्तीची कारवाई होत आहे. जप्त वाहने आरटीओ कार्यालय, पोलीस ठाणे, एसटी डेपो किंवा अन्यत्र ठेवली जाताहेत. मालकाकडून दंड वसूल तर चालकाचा परवाना निलंबित करून वाहनाची नोंदणी रद्द केली जाईल.मेशी धोबीघाटातील अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मालेगाव परिवहन विभागाच्या कक्षेत सर्वाधिक अपघात मालेगाव- सटाणा रस्त्यावर झाले आहेत. यापूर्वी २८ डिसेंबर २०१७ रोजी शेमळी गावाजवळ मालट्रकने अॅपेरिक्षाला दिलेल्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार झाले होते. त्यानंतर हा मोठा भीषण अपघात झाला आहे. सटाणा ते मालेगाव, मालेगाव- नामपूर, चाळीसगाव चौफुली ते कळवाडी फाटा, मनमाड चौफुली ते उमराणे या ठिकाणांवर अॅपेरिक्षाद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. मालेगाव परिवहन कार्यालयाच्या नाकावर टिचून शहरात मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांचे थांबे आहेत. बसस्थानकाजवळूनही प्रवासी वाहतूक केली जाते.
परिवहन विभाग झाले खडबडून जागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 10:28 PM
देवळा- मालेगाव रस्त्यावर मेशी धोबीघाटातील वळणावर झालेल्या बस व अॅपेरिक्षा अपघातानंतर येथील परिवहन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खासगी आॅटोरिक्षांची पुढील १५ दिवस विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालेगाव विभागात आतापर्यंत सहा अॅपेरिक्षांवर कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देमेशी अपघात । अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक ठरतेय जीवघेणी