नायगाव: सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील म्हाळोबा-बिरोबा महाराज यांचा दोन दिवशीय यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. कुस्त्यांच्या दंगलीने यात्रेची सांगता झाली.येथील भगत मळयात असलेल्या म्हाळोबा-बिरोबा देवतांच्या यात्रोत्सवाची मंगळवारी शांततेत सांगता झाली. रविवारी पहाटे भगत परिवारातील मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. सायंकाळी सजवलेल्या बैलगाडीच्या रथातून देवतांच्या मुखवट्यांची मिरवणूक संबळ-पिपाणीच्या निनादात गावातून काढण्यात आली होती. मिरवणूकीत अबालवृध्दांसह लहान मुले व महिलांनी गर्दी करत देवतांच्या नावाचा जयघोष केला. मिरवणूक नायगाव-सायखेडा-शिंदे या त्रिफुलीवर येताच शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. विविध रंगाच्या फटाक्यांच्या रंगीत प्रकाशाने आसमंत उजळुन निघाला होता. मिठाईवाले, खेळणी व रहाटपाळण्यांच्या भोवताली खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. रात्री मनोरंजनासाठी राजु बागुल व आम्रपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा पार पडला.
नायगाव येथे म्होळाबा-बिरोबा यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 5:33 PM