मालेगावच्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करा : आमदार मौलाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:47+5:302021-03-30T04:11:47+5:30
मालेगाव : शहरातील सामान्य व सहारा रुग्णालयात महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांवर प्राधान्यक्रमाने उपचार करावेत, अशा सूचना ...
मालेगाव : शहरातील सामान्य व सहारा रुग्णालयात महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांवर प्राधान्यक्रमाने उपचार करावेत, अशा सूचना मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मो.इस्माईल यांनी आरोग्य यंत्रणेला केल्या आहेत.
सोमवारी येथील सामान्य रुग्णालय, साहारा रुग्णालय, तसेच ऑक्सिजन सिलिंडर पुरविणाऱ्या एजन्सीच्या गोदामाची आमदार मौलाना मुफ्ती यांनी पाहणी करून उपाययोजनांचा आढावा घेतला. मालेगाव शहरात रुग्णसंख्या वाढत आहे, तसेच कळवण सटाणा, देवळा, नांदगाव इतर शहरांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहेत मालेगाव जवळच्या या शहरांमधील रुग्ण मालेगावी उपचाराला येत आहेत. मालेगावमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यास हरकत नाही. मात्र, सध्या महापालिका क्षेत्रातील रुग्णांनाच ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने, शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. सहारा रुग्णालयात शहराबाहेरील रुग्णांवर उपचार केला जात आहे. सामान्य रुग्णालयातही खाटा उपलब्ध नाहीत, शहरातील रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नाही, राज्य शासनाने शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र खाटांची व्यवस्था व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे.