पिंपळगाव बसवंत : साप दिसला की त्याला वाचवणारे कमी आणि मारणारे जास्त असतात तसेच मुंगूस व सापाची लढाई झाली तर त्याचे व्हिडिओ चित्रकारण करणाऱ्यांचीही कमी नाही; परंतु एक तासाच्या अथक परिश्रमानंतर चक्क मुंगसाच्या तावडीतून सुटका करून कोब्रा नागावर मलमपट्टी केली व विषारी जातीच्या कोब्रा सापाला पिंपळगाव येथील सर्पमित्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने जीवदान देण्यात आले आहे.
पिंपळगाव शहर परिसरातील नारायण टेंभी येथील शेतकरी जयराम मोरे यांच्या शेतात मंगळवारी (दि. १) सकाळी ११ वाजता कोब्रा जातीचा नाग व मुंगसाची लढाई होताना दिसली. त्यात नाग गंभीर जखमी झाला होता. हे दिसताच मोरे यांनी पिंपळगाव येथील सर्पमित्र योगेश डिंगोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना बोलाविले. डिंगोरे यांनी आपले सहकारी स्वप्निल देवरे यांना सोबत घेऊन मोरे यांचे शेत गाठले व मुंगूस व सापाच्या लढाईत मध्यस्थी करून मुंगसाला पळवून लावले व त्या नागाची सुटका केली. मुंगसाच्या हल्ल्यात सापाचे आतडे बाहेर आले होते. सर्पमित्रांनी त्या नागाला एका बरणीत टाकले व शासकीय पशुधन वैद्यकीय अधिकारी अल्केश चौधरी यांना संपर्क करून पशुधन रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर एक तासांच्या अथक प्रयत्नाने त्याचे प्राण वाचवले. उपचारादरम्यान सापाने कुणाला दंश करू नये म्हणून त्याचे तोंड एका नळीत बंद करण्यात आले होते. सापाला १५ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, मलमपट्टी व शस्रक्रियेद्वारे अनेक विषारी सापांचे जीव पिंपळगाव येथील सर्पमित्रांनी व पशुधन अधिकाऱ्यांनी वाचवले आहेत. यावेळी या विषारी जातीच्या नागाला वाचवण्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी अल्केश चौधरी, संदीप शेजवळ, नीलेश गायखे, कुणाल धनवटे, कारभारी आगळे, मधुकर निकम, रामचंद्र पावले, प्रवीण गांगुर्डे, अशोक शिंदे, पावन शिंदे सर्पमित्र योगेश डिंगोरे, स्वप्निल देवरे आदींनी परिश्रम घेतले.
--------------
सर्पमित्रांच्या मदतीने जखमी नागावर उपचार केले. उपचार करण्यास मोठे आव्हान होते. तरीही नागाला जीवदान देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. उपचार करून मनस्वी आनंद झाला.
- अल्केश चौधरी, शासकीय पशुधन विकास अधिकारी, पिंपळगाव बसवंत
..........................
मुंगसाने नागावर हल्ला केल्याचे समजताच आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेत मुंगसाच्या तावडीतून नागाची सुटका केली. त्यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले.
- स्वप्निल देवरे, सर्पमित्र, पिंपळगाव बसवंत
---
मुंगसाच्या तावडीतून कोब्राची सुटका करून त्याच्यावर शस्रक्रिया करताना शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी अल्केश चौधरी, नीलेश गायखे, सर्पमित्र योगेश धनवटे, स्वप्निल देवरे आदी. (०२ पिंपळगाव १)
===Photopath===
021220\02nsk_7_02122020_13.jpg
===Caption===
०२ पिंपळगाव १