नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कॉलेज आॅफ हेल्थ सायन्सेस नैरोबी विद्यापीठ आणि मर्क सेरोनो, मिडल ईस्ट, दुबई यांच्या संयुक्तमाने ‘मआविवि - मर्क आफ्रिका इंटरनॅशनल फेलोशिप प्रोग्राम इन मेडिकल आॅकोलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे दुबई येथील मर्क सेरोनो मल्टीनॅशनल कंपनीच्या चीफ सोशल आॅफिसर राशा केलेज यांनी सांगितले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ, युनिव्हर्सिटी आॅफ नैरोबीचे प्राचार्य प्रा. अॅझॅक किब्वेज, नैरोबीचे प्राध्यापक निकोलस अभिन्या, बिजिनेस रिस्पॉन्सबिलीटी अॅण्ड मार्केट डेव्हलपमेंट आॅफ्रिकेचे संचालक लिओनार्द सायका, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट, टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भरमाल आदि उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कॉलेज आॅफ हेल्थ सायन्सेस नैरोबी विद्यापीठ आणि मर्क सेरोनो, मिडल ईस्ट, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मआविवि-मर्क आफ्रिका इंटरनॅशनल फेलोशिप प्रोग्राम इन मेडिकल आॅकोलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करणेसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ, मर्कच्या चीफ सोशल आॅफिसर राशा केलेज व युनिव्हर्सिटी आॅफ नैरोबीचे प्राचार्य प्रा. अॅझॅक किब्वेज यांनी स्वाक्षरी केली.याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले की, अभ्यासक्रमासाठी दहा सेंटर्सची नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक सेंटरमध्ये दोन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पहिले सहा महिने हे विद्यार्थी भारतातील केंद्रांमध्ये निरीक्षकाच्या भूमिकेत राहतील व अध्ययन करतील. ही सर्व दहाही केंद्रे माहिती तंत्रज्ञानाने जोडली जाणार असून, अत्याधुनिक अशा वेबेक्स सिस्टीमचा उपयोग यात केला जाणार आहे. या प्रणालीद्वारे वैद्यकीय विद्यार्थ्यांना विविध रुग्णांच्या उपचार पद्धतीबाबत चर्चा करता येऊ शकेल. त्यानंतरची पुढील सहा महिने नैरोबी येथे हे विद्यार्थी परतणार असून, तेथील महाविद्यालयात अभ्यासक्रम करतील. (प्रतिनिधी)
आरोग्य, नैरोबी विद्यापीठ यांच्यात करार
By admin | Published: December 09, 2015 12:14 AM