लॉक डाऊनची संधी साधून अंबड येथे वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:16 PM2020-05-12T19:16:39+5:302020-05-12T19:20:50+5:30
शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडावर असलेली सुमारे अडीचशे ते
तीनशे झाडे एप्रिल अखेरीस तोडण्यात आली आहे. यासंदर्भात महापलिकेकडे
तक्रार करून दखल घेण्यात आली नसल्याची तक्रार पर्यावरण कार्यकर्त्याने
केली आहे. महापालिकेने यांसदर्भात उदासिनता दाखवल्याने संबंधीत
कार्यकर्त्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली
आहे.
सध्या लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने वृक्ष तोड करणाऱ्यांना फावले आहे.
यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या परीसरातील जंगलात वृक्ष तोड
झाली होती. संंबधीतांचा माग काढत वनखात्याने संबंधीतांवर कारवाई केली
होती. मात्र, शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे.
यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस
वैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. अंबड येथील सुमीत
कंपनीच्या भूखंडावर असलेली बहारदार करंज, निलगीरी आणि अन्य सुमारे
अडीचशे ते तीनशे झाडे २८ ते ३० एप्रिल दरम्यान तोडण्यात आली. इतक्या
मोठ्या प्रमाणात नियोजनबध्द पध्दतीने वृक्षतोड होत असताना देखील
महापालिकेल्या किंवा औद्योगिक विकास महामंडळाला त्याचा पत्तालही लागला
नाही, हे सारेच शंकास्पद आहे. या वसाहतीत जाणाऱ्या आणि येणाºया काही
नागरीकांनी वृक्ष तोड बघून हळहळ व्यक्त करतानाच यासंदर्भात तक्रार
करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरण स्नेही उपक्रम राबविल्याचे
सांगितले जात असताना दुसरीकडे ढासळत्या पर्यावरण संतुलनाकडे दुर्लक्ष
केले जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाने दखल न घेतल्याने
कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली
आहे.त्यांनी प्रशासनाला त्याची दखल घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची
गंभीर दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली
आहे.