झाडांना नसते कुठली जात आणि धर्म, झाडांना नसतात सीमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:41+5:302021-06-30T04:10:41+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा येवलाच्या वतीने आयोजित माझी कविता, काव्यमाला या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. झाड एक चिंतन, ...
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा येवलाच्या वतीने आयोजित माझी कविता, काव्यमाला या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.
झाड एक चिंतन, या एकाच विषयावरील विविध कवितांमधून त्यांनी विविध अंगाने झाडाची मनस्थिती, मानसिकता, त्याग, झाडाचे समाजशील वागणे, त्यांचे जगणे, झाडांविषयीची संवेदना त्यांच्या शब्दांतून व अनुभूतीतून व्यक्त केली. या कार्यक्रमातून झाडांविषयीचे सूक्ष्म व दूरगामी चिंतन बारहाते यांच्या कवितेतून ऐकायला मिळाले.
झाड व्याकूळ होते उन्हात चालणाऱ्या
जिवाला पाहून झाडाला माहीत नसतं
त्याच्या हातात कुऱ्हाड आहे की, पाणी....
अशा अर्थपूर्ण ओळींमधून झाडाची जिवाजिवांबद्धल असलेली संवेदनशीलता बारहाते यांनी व्यक्त केली. झाडाचे समर्पण व त्याग बारहाते यांनी, ‘झाड आयुष्यभर माणसासाठीच जगते, माणूस गेल्यानंतरही माणसासोबतच जळते. झाडाची उंची मोजता येते, पण खोली नाही. झाड कवेत घेता येते, पण सावली नाही’ या झाडाची व्यापकता प्रतिबिंबित करणाऱ्या ओळी दाद देऊन गेल्या. हे या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प होते.
परिषदेचे कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी परिचय करून दिला. कवी बाळासाहेब सोमासे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात लेखक व समीक्षक प्रा. डॉ. एकनाथ पगार, कवी लक्ष्मण महाडिक, प्रा. बाळासाहेब हिरे, सुनील गायकवाड, सचिन साताळकर आदींसह काव्यरसिक सहभागी झाले होते.