त्र्यंबकेश्वर : वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या एका आदिवासी कुटूंबाची सुटका करण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी या गावातील आदिवासी कुटुंबाला वेठबिगार म्हणून बंधक बनवलेल्या कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या १३ वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांची या गावात झालेली अचानक भेट हा गंभीर प्रकार उघड होण्यास कारण ठरली. नंतर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठबिगारीच्या पाशातून मुक्त केले, याबाबत या कुटुंबाने मुक्त होताच मोखाडा पोलीस ठाणे गाठत तक्र ार दाखल केली आहे.मोहन भिका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन यांचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी येथे राहतात. पूर्वी ते भिवंडीतील पडघ्याला वीटभट्टीवर कामासाठी जायचे. मागील गणपती उत्सवाच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले यांनी काम आहे म्हणून मोहन, त्याचे आई-वडील, गौरी (७ वर्षे) , बायडी (९वर्ष) आणि शैला (१३ वर्षे ) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब उल्हासनगर येथे नेले. तिथे वीटभट्टीजवळ एका खोलीत त्यांना ठेवले, विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला - उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे करून घेतली. सुट्या मजुराला ( रोजंदारीच्या) ४०० रूपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ २०० व महिलेला १०० मजुरी देत होता. स्वत:कडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणाºया मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.दिवाळीमध्ये या लोकांनी घरी जायचे सांगितले तर मालकाने त्यांना विरोध केला. मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवले व हे कुटुंब परत यावे म्हणून शैलाला ताब्यात ठेवतो असे सांगत एक रु पया दिला नाही. जवळ वाचलेले हजार रु पये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली. घरी शासकीय योजनेतून घरकुल आलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. गावातील कुणाकडून तरी वडिलांनी ५०० रूपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि तीन बहिणींसोबत त्यांना पुन्हा उल्हासनगर येथे पाठविले. कारण आपली छोटी मुलगी तिकडेच मालकाकडे होती.परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाने कच्या विटा एकावर एक रचून झोपडे बनवून राहायची व्यवस्था केली. त्यानंतर योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्याकडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागेल, बाहेर मिळालेल्या ३०० रूपये मजुरीतून १०० रु पये द्यायचा कधी ते ही देत नसे, राजू हा गौरीला मारहाण करायचा शिवीगाळ करायचा. काम झाल्यावर मजुरांना पाय धरायला लावायचा, मोहनची आई आणि बहिणींना देखील अनेकदा पाय धरायला लावायचा मग हजेरी लिहायचा. त्रास वाढत चाललेला, पळून जावे वाटायचे मात्र शेठच्या भीतीने निमूट काम करत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. याबाबत मोहनने वडील भिका दिवे यांना याबाबत फोन करून सांगितलेले. शेवटी त्याने गावात याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. मोखाड्यातुन पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह राजेश चन्ने, वासू वाघे इत्यादी कल्याण अंबरनाथमधील कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. नुकत्याच झालेल्या निवडणुकी दरम्यान विवेक पंडित यांचे या गावात जाणे येणे सुरु होते. पंडित यांनी लक्ष घालत सदर कुटूंबाची सुटका केली.
वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटूंबाची सुटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 2:16 PM