देवळाली कॅम्प : नाशिक जिल्ह्यातील गावागावांत शिवसेनेची पाळेमुळे दिवंगत माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्यामुळेच रुजली. जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष होण्यासाठी राजाभाऊंचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले. देवळाली कॅम्प झुलेलाल मंदिरात माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या शोकसभेत घोलप यांनी शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच्या काळात राजाभाऊंसोबत केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला. आमदार सुधीर तांबे यांनी राजाभाऊंकडे कुठलेही काम घेऊन गेल्यावर त्यांनी पक्ष, जात-पात असे काहीच न बघता अत्यंत प्रामाणिकपणे संबंधिताचे काम पूर्ण होण्यासाठी स्वत: पाठपुरावा केल्याचे सांगितले. आमदार योगेश घोलप यांनी शिवसेनेच्या ग्रामीण भागाचा चेहरा म्हणजे राजाभाऊ असून त्यांचे राहणीमान व कामाची पद्धत प्रत्येकाला आपलेसे करून जात असे स्प्ष्ट केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, महाराज बिरमानी, नितीन ठाकरे, एकनाथ शेटे, सचिन ठाकरे, अॅड. गोरखनाथ बलकवडे, अॅड. खंडेराव मेढे, निवृत्ती जाधव, प्रा. सुनीता आडके, जगदीश गोडसे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेस खासदार हेमंत गोडसे, बाबूराव मोजाड, तानाजी करंजकर, भागू कटारिया, भाऊसाहेब धिवरे, सरोज आहिरे, प्रशांत दिवे, विश्वनाथ काळे, अरुण जाधव, प्रवीण पाळदे, हसानंद निहलानी, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.
देवळाली कॅम्प येथे गोडसे यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:46 AM