त्र्यंबक रस्त्यावरील वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:45 AM2019-12-23T01:45:10+5:302019-12-23T01:45:33+5:30
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेली झाडे तसेच त्र्यंबक रस्ता सुशोभिकरण करताना दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे सध्या अनधिकृतपणे तोडली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक वृक्षप्रेमी नागरिकांनी केलेल्या आहेत.
नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेली झाडे तसेच त्र्यंबक रस्ता सुशोभिकरण करताना दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे सध्या अनधिकृतपणे तोडली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक वृक्षप्रेमी नागरिकांनी केलेल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर-नाशिक शहरात प्रमुख तीर्थ आणि पर्यटनक्षेत्र असल्यामुळे या मार्गावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक हॉटेल्स असून, हॉटेल्सचे फलकदेखील लावण्यात आलेले आहेत. परंतु सदर फलक तसेच दिशादर्शक फलक झाडांमुळे झाकले जात असल्याच्या कारणावरून अनेक ठिकाणचे वृक्ष तसेच काही ठिकाणी फांद्या छाटण्यात येत आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने अशाप्रकारचे बोडके झालेले वृक्ष ठिकठिकाणी बघायला मिळतात.
या प्रकरणी काही स्थानिकांनी महामार्ग विभाग तसेच त्र्यंबक नगरपालिका हद्दीतील झाडांबाबत नगरपरिषदेलाही तक्रारी केलेल्या आहेत. मात्र अजूनही या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याने वाढीस लागलेल्या या झाडांचे संरक्षण कसे करणार, असा प्रश्न वृक्षप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे.