------
नाशिक : मनपाच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात मागील महिन्यात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेने २४ रुग्णांचा बळी घेतला. या दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला. यावेळी सर्वप्रथम मदतीची हाक अग्निशमन दलाच्या कानी आली. मुख्यालयाचा दूरध्वनी खणखणला अन् जवानांनी सज्ज होत अवघ्या ५ मिनिटांत रुग्णालय गाठले.
झाकीर हुसेन रुग्णालयाबाहेर असलेल्या ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने सर्वत्र पांढरा धूर आणि अति थंडावा पसरलेला होता. नागरिकदेखील भीतीपोटी लांब पळत होते आणि टाकीभोवती ऑक्सिजनचा भरणा करण्यासाठी आलेला टँकर उभा होता. सर्वप्रथम आपत्कालीन मदत देण्यासाठी पोहोचलेल्या जवानांना डोळ्यांसमोर यावेळी केवळ धूर दिसत होता. दृश्यमानता संपूर्णपणे नष्ट झाली होती. याप्रसंगी घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन विभागप्रमुख संजय बैरागी, फायरमन उदय शिर्के, ज्ञानेश्वर दराडे, तौसिफ शेख, सोमनाथ थोरात, शरद डेटके यांनी प्रारंभी कमी व्यासाच्या पाईपच्या मदतीने पाण्याची फवारणी धुरावर करण्यास सुरुवात केली; मात्र धूर काहीही कमी होत नव्हता. त्यामुळे समोर काहीच दिसत नव्हते. गळती थांबवली गेली आणि काही वेळेत धुराचे वातावरण निवळले. त्यानंतर घटनास्थळी तंत्रज्ञ चमूला टाकीचा ऑक्सिजन पुरवठा करणारा पाईपच फुटल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि तत्परता यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा अपव्यय रोखण्यास मदत झाली, अन्यथा यापेक्षाही मोठा अनर्थ घडला असता.
--
----इन्फो----
जीवघेण्या धुरात धाडसाने शिरकाव
ऑक्सिजन टाकीच्या भोवती पसरलेल्या अतिथंड वातावरणात बैरागी आणि शिर्के यांनी ‘बी.ए.’ सेट लावून या अतिथंड अशा पांढऱ्या धुरात धाडसाने प्रवेश केला. यावेळी दुसऱ्या बाजूने अन्य जवान पाण्याची फवारणी करत होते. ऑक्सिजन गळती सुरूच राहिल्याने धुराचे प्रमाण कमी होत नव्हते. हा धूर गरमऐवजी कमालीचा थंड होता, असे जवानांनी सांगितले. ऑक्सिजन टाकीच्या व्हॉल्व्हभोवती लावलेले ‘सेफ्टी किट’ तोडून टाकीचा व्हॉल्व्ह बंद करण्याचे पहिले लक्ष्य जवानांपुढे होते. त्यानुसार बैरागी यांनी शिर्के यांच्या मदतीने प्लास्टिकचे आवरण तोडून सेफ्टी किट खुो करत सुमारे अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर टाकीचा व्हॉल्व्ह बंद केला आणि होणारी गळती थांबली.
-------
कोट
२७ वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच अशाप्रकारच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले. अतिथंड वातावरण, पांढरा धूर यामुळे समोर काहीच दिसत नव्हते. वाऱ्याची दिशा कधी बदलेल आणि धुराचे लोट त्या दिशेने सरकण्यास मदत होईल, याची प्रतीक्षा आम्हाला लागून होती. तोपर्यंत आम्ही सगळेच आमच्या परीने प्रयत्न करत होतो. बी.ए. सेटच्या मदतीने आमचे अधिकारी धुरातही गेले. पाण्याच्या फवारणीमुळे ऑक्सिजनचे रूपांतर पाण्यात होण्यास मदत झाली. ही दुर्घटना काळजाचा थरकाप उडवणारी होती.
- ज्ञानेश्वर दराडे, फायरमन
----
सर्वत्र पसरलेला पांढरा धूर आणि नागरिकांची धावपळ अशा स्थितीत मोठ्या संयमाने बैरागी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुर्घटनेची परिस्थिती हाताळत होतो. पाण्याचा मारा करूनही फारसा फरक पडत नव्हता. दृश्यमानता कमीच होती आणि ऑक्सिजन गळती थांबविणे हे आमचे टार्गेट होते. त्यामुळे बैरागी साहेबांनी बी.ए. सेट लावून टाकीच्या दिशेने जाण्याचे आदेश दिले. काही मिनिटांत मी आणि त्यांनी बी.ए. सेट परिधान करून आता प्रवेश केला. सर्वप्रथम आम्ही टाकीचा व्हॉल्व्ह शोधून काढला. यावेळी त्यावर सुरक्षिततेच्या कारणास्तव सेफ्टी किट लावण्यात आलेले होते. हे किट आम्ही तोडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यात अखेर यश आले. या दुर्घटनेने अंगावर शहारे आले होते आणि २२ रुग्णांचा जीव गेल्याचे ऐकून मन सुन्न झाले होते.
- उदय शिर्के, फायरमन
-
फोटो nsk वर सेंड केले आहेत.