२४ मार्च हा जागतिक क्षयरोग (टिबी) जागृती दिन म्हणून साजरा केला जातो. २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे भारताचे उद्दिष्ट कोरोनामुळे अवघड वाटत आहे.यावर्षीची क्षयरोग दिनाची संकल्पना काळ धावत आहे, अशी आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी वेळ कमी पडत आहे. यासाठी पुन्हा सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे .कारण कोरोनाचे मोठे आव्हान समोर उभे आहे.
२०२० मध्ये लॉक डाउनमुळे आणि कोरोनाची साथ वाढल्यामुळे क्षयरोगात काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी तसेच क्षयरोग निदानासाठी लागणारी मशिनरी हे सर्व कोरोनाकडे वळवले गेले. क्षयरोगाचे रुग्ण उपचारासाठी घराबाहेर पडू शकले नाही. यामुळे मागच्या वर्षी या आजाराचे फक्त पंचवीस टक्के रुग्ण सापडले. ७५ टक्के रुग्णांचे निदान होऊ शकले नाही आणि या रुग्णांनी क्षय रोगाचा आजार पसरवला असण्याची शक्यता आहे.
क्षय रोगाचा आजार कोरोना ,स्वाइन फ्ल्यूसारखाच घातक आहे .कोरोना ,स्वाइन फ्ल्यू मध्ये आजार लवकर पसरतो आणि माणसाचा मृत्यू लवकर होऊ शकतो याच कारणास्तव या आजाराचा धसका घेतला जातो, परंतु क्षय रोगाचा आजार हा हळूहळू रुग्णाला नष्ट करतो. जगामध्ये आत्तापर्यंत १२३ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली व २.७ दशलक्ष लोकांचा मृत्यु झाला आहे. गेल्या २०१९ मध्ये १० दशलक्ष लोकांना क्षय रोगाची लागण झाली व १.४ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. भारतामध्ये ११.६ दशलक्ष लोकांना कोरोना संसर्ग झाला तर २४ लाख लोकांना क्षयरेागाची लागण झाली. भारतातील टीबी रुग्णांची संख्या अजून जास्त असू शकते कारण ३० ते ४० टक्के लोकांचे निदान होत नाही. भारतामध्ये १५ ते ४५ या वयोगटातील लोकांना जास्त प्रमाणात क्षयरेाग झालेला आढळतो. मात्र जे रुग्ण नियमित औषधे सेवन करतात त्यांचा आजार पूर्णपणे बरा होतो .गेल्या काही वर्षात क्षय रोगाच्या आजारामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मार्च २०२० च्या लॉकडाऊन नंतर तीन ते चार महिने क्षय रोग झालेल्या रुग्णांना रोग्य सुविधा मिळाल्या नाहीत. क्षयरोगाचे संशयित रुग्ण किंवा उपचार सुरू असलेले रुग्ण घराबाहेर पडू शकले नाहीत, त्यामुळे क्षयरोगाच्या निदानाला तसेच उपचाराला उशीर झाला.
आपल्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यचे म्हंटले जात आहे . त्यामुळे परत क्षय रोगाचे निदान आणि उपचार याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि असे झाले तर पुढील दोन वर्षात क्षय रोग झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढून जास्त लोकांचा या आजारामुळे मृत्यू होऊ शकतो.
आपल्याकडे बहुतांश लोक हे दाट वस्ती आणि छोट्या घरांमध्ये राहतात. कोरोनामुळे अशा वस्तीतील लोकांचा रोजगारावर परिणाम झाला. त्यात कुपोषण, दारिद्रयाची भर पडली .या सगळ्याचा परिणाम क्षय रोगाचे रुग्ण वाढण्यावर होण्याची शक्यता आहे किंवा टीबीचे निदान न झालेले रुग्ण आजार पसरवू शकतात. क्षय आणि कोरोनाची लक्षणे सारखी आहेत. कोरोना त्रास सुरू झाल्यापासून सात दिवसात खूप तीव्रतेने वाढतो याच्याविरुद्ध टीबीचा आजार त्रास सुरु झाल्यापासून हळूहळू वाढतो म्हणून एखाद्या रुग्णाला जर ताप खोकला ही लक्षणे असतील तर कोरोना आहे का क्षय याचे निदान व त्यानुसार उपचार होणे गरजेचे आहे.
क्षय रोग आणि कोरोना हे दोन्ही आजार संसर्गजन्य आहेत. हवेतून त्याचा संसर्ग होतो. म्हणून दोन्ही आजारापासून बचावासाठी खोकताना शिंकताना तोंडावर आपला दंड ठेवावा. तसेच एकमेकांपासून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे व मास्क वापरावे, गर्दीत जाणे टाळावे, रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती घेणे. घरी ,कामाच्या ठिकाणी मोकळी, हवेशीर जागा असावी. साबण पाण्याने वीस सेकंद हात स्वच्छ धुवावेत, अशी दक्षता घेतल्यास क्षय रोगावर आजार चटकन बरा हाेईल.
- डॉ गौरी आचार्य- कुलकर्णी, क्षयरोग , फुफ्फुस विकार तज्ञ