नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेल्या बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊनच्या निर्णयाच्या कठोर अंमलबजावणीसाठी कडक पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटले आहे.
कोरोनाची साथ थोपविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्राधिकरणाची बैठक घेत बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब केले गेले. सोमवारी दुपारी याबाबत भुजबळ यांनी अधिकृत घोषणा केली.
सध्या समोर येणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण एप्रिलच्या पंधरवड्याच्या तुलनेत कमी असले तरी ते खूप समाधानकारक नाही. यामुळे अजूनही वेळ गेलेली नसल्याचे लक्षात घेत आता उद्यापासून (दि.१२) ते येत्या २२ तारखेपर्यंत दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कालावधीत नियम व निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार नाही. पूर्वीपेक्षा अधिक नियम कठोर करण्यात आले असून, निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस प्रशासनाला करावे लागणार आहे. याबाबत बोलताना दीपक पांडेय म्हणाले की, सर्व पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी लावण्यात आली असून, ती अधिकाधिक कडक केली जाईल. नाकाबंदीचा बंदोबस्त वाढविला जाणार आहे, तसेच सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तदेखील कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बंदोबस्ताच्या नियोजनाची जबाबदारी परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे आणि परिमंडळ-२चे उपायुक्त विजय खरात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. १२ तारखेपासून बाहेर पडणाऱ्या, नियम मोडणाऱ्या नागरिकांवर नक्की काय कारवाई करता येईल, नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी नाकाबंदी पाॅइंट्स वाढवावे की विभागनिहाय बॅरिकेडिंग करावी, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.