पहिनेच्या जंगलात बारा तास आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 12:42 AM2021-03-07T00:42:38+5:302021-03-07T00:43:03+5:30
नाशिक : त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पहिने गावाच्या शिवारातील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैधरीत्या घुसखोरी करत, भटकंतीच्या नावाखाली दोघा तरुणांनी निष्काळजीपणा दाखवून धूम्रपान करत फेकलेल्या सिगारेटच्या थोटकांमुळे मोठा कृत्रिम वणवा भडकला. भडकलेली आग विझविताना वनकर्मचारी व सुमारे दीडशे ग्रामस्थांच्या नाकीनव आले. शनिवारी (दि.६) पहाटेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत सुमारे ३७ हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले, तसेच सुमारे २० ते २५ हजार रोपे नष्ट झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या कृत्रिम वणव्यात जैवविविधतेची अपरिमित हानी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

मार्च महिन्याला प्रारंभ झाल्याने उन्हाच्या झळा अतितीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहे. शहरासह जिल्ह्यातील पारा वेगाने वाढत असल्यामुळे जंगलातील रानगवत वाळून एखाद्या ज्वलनशील पदार्थांइतकेच घातक झाले आहे. यामुळे या गवताचा ज्वलनशील घटकांशी संबंध येताच कृत्रिम वणवे त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात मागील आठवडाभरापासून भडकत आहे. पहिने गावाचा परिसर निसर्गरम्य असून, पावसाळ्यासह बारामाही हा भाग शहरी नागरिकांना आकर्षित करत असतो. येथील डोंगररांगा व राखीव वनांमध्ये भटकंतीसाठी तरुणाई जात असते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पहिनेजवळी राखीव वनाभोवती महाविद्यालयीन दोघा तरुणांनी धूम्रपान करत दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे मोठी आग भडकली. पहिनेच्या ३५३ गटात भडकलेल्या या मानवनिर्मित वणव्यामध्ये सुमारे दोन वर्षे वाढ झालेली हजारो रोपे होरपळून राख झाली. वाळलेले गवत आणि पाळापाचोळा वेगाने पेटू लागल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत, त्र्यंबकेश्वर वन कर्मचाऱ्यांना माहिती कळविली. माहिती मिळताच पारंपरिक पद्धतीने आग विझविण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली.
राखीव वनात बारा तास आगीचे तांडव
पंधरा ते वीस वनर्कमचारी आणि दीडशे गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालत रात्रीच्या काळोखात आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. झाडांच्या तोडलेल्या ओल्या फांद्यांची ह्यझाडूह्ण तयार करत झोडपणी करून पेटलेले गवत विझवित होते. मात्र, वारा रात्री प्रचंड सुटल्याने भडकलेली आग काही करता शमत नव्हती. शुक्रवारी (दि.५) संध्याकाळी सात वाजल्यापासून भडकलेली आग शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत विझता विझत नव्हती. या आगीवर शनिवारी सकाळी आठ वाजता पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास यश आले.
दोघे संशयित ताब्यात; दोघे फरार
गावकऱ्यांच्या मदतीने संशयित सौरभ संदीपान पवार, चंद्रकांत भट्टू महाले या दोघा संशयित तरुणांना वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. त्यांचे दोन साथीदार मित्र मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या दोघांना इगतपुरी तालुका न्यायालयात शनिवारी हजर केले असता, न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. पवार व महाले हे त्यांच्या दोन मित्रांसह राखीव वनाजवळ मद्यपान-धूम्रपान करत होते, यावेळी त्यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. हे दोघेही युवक वैद्यकीय शाखेच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.
फोटो आर वर ०६फायर नावाने